पंचस्तरीय फळबाग जंगल पाळेकर माॅडेल: लेखांक # 1

कृषी-ऋषी पद्मश्री सुभाष पाळेकर, अमरावती, महाराष्ट्र.
पंचस्तरीय फळबाग जंगल पाळेकर माॅडेल: लेखांक क्र. 1

      मित्रांनो, आज आपण एकरी सहा लाख रुपये उत्पन्नाचे ऊद्दिष्ट व अंतिम एकरी बारा लाख रुपये उत्पादनाचे उघड्या डोळ्यांनी बघणारे स्वप्न उराशी घेऊन  पंचस्तरीय फळबागजंगल पाळेकर माॅडेल ( पथदर्शक प्रकल्प) सुभाष पाळेकर नैसर्गिक शेती तंत्राने कसे उभे करावे, ह्याबाबत विस्ताराने चर्चा करणार आहोत. ह्यातील जंगल व एकरी बारा लाख हे उल्लेख वाचून काही पाळेकर कृषी विरोधी लुटारुं दलाल कुत्सीतपणे नक्कीच हसले असतील. हसूं द्या, त्यांना त्याचा टिंगलटवाळीचा स्वर्गीय आनंद घेऊं द्या. हा पथदर्शक प्रकल्प त्या बहाद्दर नवोन्मेशी नवनिर्माणाचा ध्यास घेतलेल्या धाडशी स्वप्नाळू नफा तोट्याचा विचार न करता झोकून देणार्‍या तरुण शेतकर्‍यांसाठी देत आहे, ज्यांना जीव जमीन पाणी पर्यावरण जैवविविधता ह्या पंचमहाभुतांना व भावी पिढ्यांना विनाशापासून वाचवायचे आहे व  ज्यांना गावात राहीले तर शेतीत होणारा प्रचंड तोटा कर्जबाजारीपणा व शेवटी संभाव्य  आत्महत्या वाढून ठेवली आहे म्हणून गांव सोडून शहराकडे पळणार्‍या युवक शेतकर्‍यांना पुन्हा गावाकडे परत खेचून आणायचे आह, ह्या उदात्त उद्देशाने ग्राम स्वराज, ग्रामोन्नती व ग्राम स्वावलंबनाचे कार्य करायचे आहे, त्याच ध्येयवेड्या तरुण शेतकर्‍यांनी हे माॅडेल उभे करण्याची हिम्मत दाखवावी. हे माॅडेल उभे करण्याचा निर्णय घेण्याचे आधी आपण घरातील आई वडील भाऊ भावजय बहीण जावाई तसेच विवाह झाला असेल तर पत्नी सासू सासरे ह्या सर्वांची संपूर्ण सहमती घ्यावी व मग हे माॅडेल उभे करण्यासाठी मला नांव द्यावे. घरच्या लोकांची संमती नसेल तर आपणाला ह्या प्रकल्पात सहभागी होता येणार नाही. हा प्रकल्प राबवितांना यश अपयश नफा तोटा ह्याची संपूर्ण जबाबदारी तुमची स्वताःची असेल, आमची नसेल. कारण माॅडेल राबवतांना चुका आपण करणार आहात, आम्ही नाही. हा प्रकल्प राबवतांना सामाजिक माध्यमावर दिवसभर मुक्काम करणार्‍या रिकामटेकड्या शंकासूर टोळभैरवांनी केलेल्या नींदा टिकेकडे संपूर्ण दुर्लक्ष करण्याचे मानसिक सामर्थ्य असेल तरच हा प्रकल्प उभा करण्यासाठी समोर या, अन्यथा नाही.
    ह्या प्रकल्पाचे प्रारुप तयार करतेवेळी आपल्या शेतकर्‍यांसमोर सतत उभ्या असलेल्या अडचणींना व संकटांना समोर ठेऊनच ह्या प्रकल्पाला मी काल अंतिम रुप दिले आहे. सुभाष पाळेकर नैसर्गिक शेती तंत्राने उभी केलेली व देशभर  महत्वाच्या आंबा देशी जातींचे संकलन केलेल्या व शेती करण्यासाठी गलेलठ्ठ पगार असलेली साॅफ्टवेअर ईंजिनीयरची नोकरी सोडून परतलेल्या वाशीम येथील युवक आंबा उत्पादक श्री.रवी मारशेटकर ह्यांनी भरपुर फळे देणारी ही बाग माकडांनी व जंगली जनावरांनी केलेल्या सततच्या  प्रचंड नुकसानीमुळे शेवटी ह्यावर्षी ती बाग तोडून उखडून टाकली हे मला सांगतांना त्यांचे डोळ्यांतून घळघळणारे अश्रूं मला खुप काही संदेश देऊन गेले. अथक श्रमाने व पैसा लावून उभ्या केलेल्या नवीन फळबागा जंगली प्राण्यांनी व डुकरांनी उद्धस्त केल्यात हे संदेश मला सतत येत असतात व आपण बघत असतो.  बागेभोवती सात फूट उंचीचे तारांचे मजबुत कुंपनावरुन उड्या मारुन आत बागेत घुसून बागेचा व आंतरपिकांचा विध्वंस करणारे हरणांचे कळप आता नेहमीचीच डोकेदुखी झालेली आहे. भारताची सीमा ओलांडून आत घुसणार्‍या विदेशी घुसखोरांना बंदुकीच्या गोळीने  मारून यमसदनी पाठविणारा भारतीय सीमा रक्षक सैनिकाचे महावीरचक्र देऊन त्यंचा योग्य सन्मान करणारे देशाचे कायदे आमच्या शेतीत फळबागेत घुसून बागा उद्वस्त करणार्‍या घुसखोर जंगली प्राणी व डुक्कर रुपी बाहेरच्या घुसखोंना बंदुकीने मारणार्‍या शेतकर्‍यांना हे कायदे गुन्हेगार ठरविणार शिक्षा देणार ! का ? जंगली जनावरे डुकरे ही सरकारची मालमत्ता आहे, त्यांना शेतकर्‍यांच्या शेतात येऊ न देण्याची व त्याकरिता संपूर्ण जंगलाला सभोवती मजबूत अभेद्य कुंपण करणे सरकारचे संवैधानिक दायीत्व ठरते. पण हे होतांना दिसत नाही. म्हणून ह्या माॅडेलमध्ये मी त्या फळझाडांची निवड केली आहे, ज्यांना ही जंगली जनावरे खात नाहीत, तोंडही लावत नाहीत. जंगली जनावरांसोबतच फळांचे अतोनात नुकसान करणारे पक्षी विशेषता पोपट ह्यांची आवडती फळझाडे आपण ह्यात घेतलेली नाहीत. फक्त दाळींब व द्राक्ष ह्यां पक्षांना आवडणार्‍या दोन पिकांचा ह्यात आंतरपीक म्हणून अंतर्भाव केलेला आहे व फळे पक्षांनी खाऊं नये म्हणून कागदी पिशव्यानी दाळींब फळे व द्राक्ष घड झाकून टाकणार आहोत. ह्या माॅडेलमध्ये आपण मुख्य फळपिके अशी निवडलेली आहेत जी जंगली जनावरे व पक्षी खात नाहीत. त्या फळपिकांत नारळ,लिंबू,शेवगा,सागवानाचे खोडावर काळी मिरी,नारळाचे खोडावर काळी मिरी,सीताफळ, केळी ही समाविष्ट आहेत. त्यातच दर सहा फुटावर हादगा किंवा पांगारा व त्यावर बियांचे रेड ग्लोब, ए आर आय 516 व अनाबेशाही ह्या तीन द्राक्ष जातींच्या वेली चढवणार आहोत. कारण पुढील काळ कॅन्सर पासून वाचविणार्‍या बियांच्या द्राक्षांचा आहे., नंपुसक बीनबियांच्या द्राक्ष जातींचा नाही.
     24 फूट बाय 24 फुटावर उंच वेस्ट कोस्ट टाॅल नारळ लावणार आहोत, जे आपल्याला व आपल्या पुढील पिढ्यांना दोनशे तीनशे वर्ष भरघोस उत्पादन व सतत वर्षभर पैसे देणार आहे. त्या नारळाचे खोडावर काळी मिरी पांच वर्षांनी खोडाजवळ दोन बाजूंना चढवणार आहोत.नारळ फळांना जंगली प्राणी व पक्षी खात नाहीत. प्रत्येक दोन नारळांचे मध्ये लिंबू लावणार आहोत, जो वर्षभर भरपूर पैसा देणार आहे व जंगली प्राणी व पक्षी त्याला खात नाहीत. दर चार नारळांचे अगदी मधोमध आपण पुढील पिढ्यांना रग्गड पैसा देणार्‍या सागवानाची व शिसमची लागवड करणार आहोत व तीन वर्षांनी त्याचे खोडावर सावलीत वाढणारी देशी  काळी मिरी करीमुंडा जात लावून मग चढवणार आहोत.नारळ व लिंबू ह्या दोनचे मध्यभागी वर्षभर शेंगांचे उत्पन्न देणारा,सभोवतीच्या फळझाडांना हवेतील नत्र देणारा शेवगा घेणार आहोत व त्या शेवग्याचे फांद्यांवर काळी मिरीला बसवणार आहोत.तसेच बारा फुटावर असलेल्या नारळाची ओळ व सागवानाची ओळ ह्या दोन ओळींच्या मध्ये येणार्‍या ओळीत दर सहा फुटावर घन लागवड म्हणून एकाआड एक सीताफळ व दाळींब घेणार आहोत . सीताफळाला जंगली जनावरे व पक्षी खात नाहीत, व सीताफळाचे गरावर प्रक्रिया करण्याचे तंत्र सीताफळ उत्पादक संघाकडे उपलब्ध आहे. नंतर प्रत्येक दोन फळझाडांमध्ये आपण दर सहा फुटावर हादगा ( हेटा) किंवा पांगार्‍याचे बी किंवा छाटकलम किंवा रोप ह्या जून मध्ये लावणार आहोत. व पुढे तीन चार महिण्यांनी त्याचेपासून एक फुटावर बियांच्या द्राक्ष वेलींचे छाटकलम ( ओन रूट ) लावणार आहोत व त्या वेली हादग्याचे किंवा पांगार्‍याचे खोडावर चढवणार आहोत.सागवानाच्या दोन्ही बाजुंना डावीकडे व उजवीकडे सहा फुटावर बहुवार्षिक केळी लावणार आहोत. दर दोन फळझाडांचे मध्ये व फळझाड आणि हादग्याचे मध्ये सीमला मिरची व मिरचीचे दोन्ही बाजूला झेंडू लावलार आहोत. तसेच दर सहा फुटावरील दोन ओळींच्या मधोमध दीड फूट रुंदीची नाली काढून त्या नालीच्या दोन्ही काठावर बहूवार्षिक तूर बाजरी मूग चवळी वाल मटकी उडीद अंबाडी तीळ सूर्यफूल बाजरी नाचणी वरी म्हणजे भगर ह्यांचे बी मिसळून टोकणार आहोत, ज्यांपासून आपल्याला भाकर वरण भाजी खाण्याचे तेल व  आच्छादनासाठी जागेवरच भरपूर अवशेष मिळणार आहेत.ह्या माॅडेलमध्ये प्रयोगासाठी चाचपणी म्हणून दोन दोन झाडे दालचीनी, जाळफळ, विलायची, लवंग सुद्धा सागवानाचे एवजी घेणार आहोत. ते जर आपल्या वातावरणात टिकून उत्तम उत्पादन दिले तर पुढे त्यांचा नविन माॅडेलमध्ये समावेश करता येईल.
      हे नवीन माॅडेल कसे उभे करावे, जमिनीची आखणी, सर्वच सहयोगी फळझाडांची लावणी, रोपे व बी कोठुन उपलब्ध करायचे, आंतरपिकांचे नियोजन कसे करायचे, जीवामृत कसे केव्हा व किती द्यायचे, जीवामृत फवरण्यांचे वेळापत्रक, पीक संरक्षण, झाड आकार नियंत्रण,सिंचन , फलधारणा, फळकाढणी, फळप्रक्रिया व विक्रीव्यवस्था ह्या सर्व विषयांची चर्चा पुढील लेखांक दोन मध्रे उद्या दि.30 मे 2019 ला करणार आहत.    धन्यवाद.