पंचस्तरीय फळबाग जंगल पाळेकर माॅडेल: लेखांक # 17

कृषी-ऋषी पद्मश्री सुभाष पाळेकर, अमरावती, महाराष्ट्र.
पंचस्तरीय फळबाग जंगल पाळेकर माॅडेल: लेखांक क्र. 17

मित्रांनो, आता महाराष्ट्रात पावसाला सुरुवात झालेली आहे. मी आणखी पुढील दहा दिवस हिमाचल प्रदेशात सीमला येथे आहे, तेथे पाऊस नाही, थंडी आहे. माॅडेलच्या आखणीला व बी टोकणीला सुरुवात केलेली असेलच. जे शेतकरी मित्र हे फळबागजंगल माॅडेल हमखास उभे करणार आहेत, त्यांची माझ्यासोबत विदर्भासाठी एक वेगळी बैठक दि.9 जुलै 2019 ला नागपूर येथे घेणार आहे व तसेच पुणे येथे दि.13 जुलै 2019 ला मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र व खाणदेशातील हे माॅडेल घेऊ ईच्छिणार्‍यांची माझ्यासोबत एक वेगळी बैठक घेणार आहे. ज्यांनी हे माॅडेल करायचे हा निर्णय पुर्णपणे घेतला आहे त्यांचेसाठीच फक्त ह्या दोन्ही बैठका आयोजित केल्या आहेत. त्यांना बैठकीचे ठिकाण व बैठकीचे स्वरुप ह्याबद्दल सरळ त्यांचे फोनवर माहिती दिली जाईल. तेव्हा, ज्यांची अंतःकरणातून हे माॅडेल उभे करण्याची तीव्र ईच्छा आहे , त्यांनी त्यांचे व्हाॅट्स अॅपवरुन माझे व्हाॅट्स अॅप नं. 9850352745 वर मला आपला पत्ता, मोबाईल नंबर, व किती क्षेत्रावर हे माॅडेल घेणार आहात ही माहिती असलेला संदेश म्हणजेच मेसेज त्वरीत पाठवावा.

पीक संरक्षण निसर्ग करेल,आपण निसर्गाला त्या नैसर्गिक प्रक्रियेत मदत करणार
निसर्गाचा एक कायदा आहे— सबलांना जगण्याचा अधिकार आहे,दुर्बलांना नाही ह्या कायद्यामागे ईश्वराचा उद्देश आहे की पुढील पिढ्या बलवान निपजून त्यांचे द्वारा जैवविविधता टिकून राहावी. 84 लाख प्रकारच्या सजीवांच्या अनेक अन्नसाखळ्या व गट ईश्वराने निर्माण केले आहेत. ह्या सर्व अन्नसाखळ्या एकमेकावर अवलंबून असतात. त्या अन्नसाखळ्यांचे आपसातील व्यवहार सुरळीत चालावे म्हणून ईश्वराने काही नियम केले आहेत. पहला नियम आहे—शाकाहारी केवळ शाकाहार करेल. दुसरा नियम आहे—शाकाहारी कोणत्याही परिस्थितीत मांसाहार करणार नाही. तिसरा नियम आहे—मांसाहारी फक्त शाकाहारीलाच खाईल. आणि चवथा नियम आहे—एक मांसाहारी दुसर्‍या मासाहारीला खाणार नाही. एक मानव सोडला तर ईतर सगळे सजीव म्हणजे पशु पक्षी झाडेझुडुपे ईश्वराचे हे नियम तंतोतंत पाळतात. उदाहरणार्थ एवढा धिप्पाड सशक्त बलवान एका झटक्यात झाडे उपडून फेकणारा हत्ती त्याचेसमोर मांसाचा ढीग लावून ठेवा, त्याला खायला गवत देऊं नका, अशा स्थितीत हत्ती उपाशी राहून भुकेने तडफडून मृत्युचा स्वीकार करेल, परंतु मांसाला स्पर्षही करणार नाही. आणि मानव ? शुद्ध शाकाहारी माकडापासून विकसित झालेला मानव , ज्याला ईश्वराने शुद्ध शाकाहारी म्हणून पृथ्वीवर पाठविले, तो आज काय काय खात नाही ? सर्वच खातो ! कोंबडी,बकरे,हले, गाय,बैल,डुकरे,पक्षी,साप सर्वच खातो,उलट भूक भागली नाही तर पैसे खातो,सडका खातो,कारखाने खातो  ! काय हे ? मानवी मांसाहार हा ईश्वराचे विरोधात केलेले बंड आहे, नास्तीकता आहे, पाखंड आहे, ईश्वरनिर्मित जैवविविधता संपवण्याचे हे मानवीय षडयंत्र आहे.
  सबलांनी जगावे व दुर्बलांनी मरावे ह्यामागे संख्यानियंत्रण हा दुसरा उद्देशसुद्धा आहे. जर दुर्बल प्राणी जगले असते व त्यांना मरण्याचे भय नसते तर पृथ्वीवर प्राण्यांची प्रचंड वसाहत झाली असती व मानवाचे अस्तित्व नष्ट झाले असते. आपल्या पिकातील सबल झाडांनीच जगावे जेणेकरुन त्यांच्या पुढील पिढ्या आणखीन सबल होतील व त्यांचा वंश टिकून राहील, परंतु दुर्बल झाडांना जगण्याचा अधिकार नाही, जेणेकरुन त्यांच्या पुढील पिढ्या आणखीन कमजोर होऊन जैवविविधताच नष्ट होण्याचा धोका निर्माण होईल. त्यामुळे त्या कमजोर झाडांना जगण्याचे शर्यतीतून बाद करण्यासाठी ईश्वरांने दुर्बल झाडांना खाण्याचा अधिकार व आदेश किडी व रोगांना दिलेला आहे. तसेच ईश्वराने किडी व रोगांना आदेश दिला आहे की त्यांनी सबल झाडांना हात लावूं नये, त्यांना खाण्याचा प्रयत्न करू नये. म्हणून आपण पाहतो की जी झाडे झुडुपे किंवा रोपे कमजोर आहेत, त्यांचेवरच किडी व रोग हल्ला करतात, सबलांना नुकसान करीत नाहीत, ईश्वराचे नियमाचे तंतोतंत पालन करतात. मी हा ईश्वराचा नियम तपासून घेतला आहे, व तो तंतोतंत खरा आहे ह्याची माझी संपूर्ण खात्री पटलेली आहे, त्यामुळे माझी ईश्वरावरील श्रद्धा आणखीन प्रघाढ झाली आहे. मी अत्यंत दुर्बल रोगट कीडग्रस्त कापूस झाडांचा कापूस वेगळा वेचून त्याचे बियाणे वेगळे ठेवले व अत्यंत स्वस्थ बलवान सशक्त लटपटुन निरोगी बोंडे असलेल्या व अजिबात कीड रोग नसलेल्या सर्वोत्तम झाडांचा कापूस वेगळा वेचून ते बी वेगळे ठेवले. नंतर पावसाळ्यात हे वेगवेगळे बी वेगवेगळ्या प्रत्येकी दहा दहा गुंठे क्षेत्रावर लावले. दोन्ही प्लाॅटला कोणतेही खत दिले नाही व कोणतीही फवारणी केली नाही. फक्त तणांचे निंदण खुरपण करुन नियंत्रण केले. ह्या प्रयोगाचे निष्कर्ष डोळे फाडणारे आहेत. मला दिसून आले की मी   ज्या प्लाॅटमध्ये कमजोर रोगट कीडग्रस्त कापूस झाडापासून घेतलेले बी लावले होते त्या झाडांना किडी रोगांनी खाऊन टाकले होते, थोडेच कीडकी बोंडे होती. परंतु ज्या बलवान सशक्त कीडरोग नसलेल्या कापूस झाडांपासून घेतलेले बी दुसर्‍या प्लाॅटमध्ये लावले होते त्या झाडांना कीड रोगांचा प्रादुर्भाव अजिबात नव्हता व लटपटून बोंडे लागली होती. असे कां व्हावे ? कारण ह्या बलवान झाडामध्ये निसर्गाने भक्कम प्रतिकार शक्ती निर्माण केली होती. ह्यातून एक सिद्धांत समोर येतो की औषध फवारणी हा उपाय नसून झाडात प्रतिकार शक्ती निर्माण करणे खरा उपाय आहे. झाडांना ही प्रतिकार शक्ती जमिनीत मुळ्यासभोवती निर्माण झालेला ह्युमस देतो. व आपण जाणताच आहात की ह्युमस फक्त सुभाष पाळेकर नैसर्गिक शेतीतच निर्माण होतो, अन्य रासायनिक शेतीत किंवा सेंद्रिय शेतीत किंवा वैदिक शेतीत किंवा योगिक शेतीत ह्युमस निर्माण होत नाही. जेव्हा आपण जमिनीवर दोन फळझाडांचे मध्ये पिकांच्या अवशेषांचे आच्छादन करतो , जमिनीला भरपूर जीवामृत व घनजीवामृत देतो व शेवगा तूर कडधान्यांचे आंतरपीक घेतो आणि मुळ्यांचे सान्निध्यात कायम वाफसा निर्माण करतो, तेव्हा आपोआपच ह्युमसची निर्मिती व संग्रह होतो, त्याद्वारे पिकांत व फळझाडात जबरदस्त प्रतिकार शक्ती निर्माण होते व किडी रोग येतच नाहीत. रासायनिक व सेंद्रिय दाळींबावर तेल्या व मर भरपूर प्रमाणात दिसून बागा उध्वस्त झालेल्या आहेत. परंतु आपल्या spnf नैसर्गिक दाळींब बागावर तेल्या व मर दिसत नाही. डिंक्या रोगाने रासायनिक व सेंंद्रीय संत्रा मोसंबी बागा उध्वस्त झालेल्या आहेत, परंतु आपल्या spnf नैसर्गिक संत्रा मोसंबीवर डिंक्या दिसत नाही. भुरी केवडा रोगांनी व पिठ्या ढेकूण  ने रासायनिक व सेंद्रीय द्राक्ष बागा व भाजीपाला पिके उध्वस्त झालेल्या आपण पाहतो, परंतु आपल्या spnf नैसर्गिक द्राक्ष बागावर व भाजीपाला पिकावर हे भयंकर रोग व कीड दिसत नाही. रासायनिक व सेंद्रीय कापसावर अमेरिकन बोंडअळी, मावा, पांढरी माशी व करपा मोठ्या प्रमाणात येऊन पीक उध्वस्त झालेले आपण पाहतो. परंतु आपल्या spnf नैसर्गिक कापसावर मात्र आपण बोंडअळी किडी किंवा रोग आलेले नाहीत हे आपण शिवारफेरीत पाहतो. तेव्हा मित्रांनो, सुभाष पाळेकर नैसर्गिक शेती तंत्राचा शंभर टक्के अंमल करा व आपले पीक किंवा फळझाडे कीडमुक्त व रोगमुक्त ठेवा.
      निसर्गाचा दुसरा कायदा आहे की कोणतेही शरीर आपल्या शरीरात शरीरबाह्य अनैसर्गिक मानवस्ंस्कारित पदार्थाचा प्रवेश सहन करीत नाही, त्याला स्वीकारत नाही. परिणामी हे बाहेरचे रासायनिक शेतीतून किंवा सेंद्रीय शेतीतून पिकांच्या किंवा फळझाडांचे शरीरात प्रवेश करून शरीराचे लाखो पेशीत साठविल्या गेलेले सायनिक खतांचे अवशेष,सेंद्रीय खतांचे अवशेष, कीडनाशकांचे अवशेष, अतिरिक्त सूक्ष्म अन्नद्रव्यांचे अवशेष, गांढूळ खतातून आलेली कॅडमीयम,आर्सेनिक,पारा,शिसा ही अत्यंत विषारी जडपदार्थ व तणनाशकांचे अवशेष पेशीत विष बणून राहतात. परिणामी झाडांला प्रतिकार शक्ती देणारे उपयुक्त जीवाणू ह्या विषाने मरतात, परिणामी शरीरात प्रतिकार शक्तीच निर्माण होत नाही व मग पीक किंवा फळझाडे कीड रोगांना बळी पडतात व शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान होते . आपल्या सुभाष पाळेकर नैसर्गिक शेतीत आपण ही कोणतेही रासायनिक  खते, सेंद्रीय खते,गांढूळ खत टाकतच नाही, रासायनिक किंवा सेंद्रीय कीडनाशके व रोगनाशके तसेच तणनाशके वापरतच नाही. त्यामुळे आपल्या पिकाची किंवा फळझाडांची प्रतिकार शक्ती नष्ट होण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही व कीड रोगांच्या आक्रमणाची किंचितही शक्यता राहत नाही.