पंचस्तरीय फळबाग जंगल पाळेकर माॅडेल: लेखांक # 7

कृषी-ऋषी पद्मश्री सुभाष पाळेकर, अमरावती, महाराष्ट्र.
पंचस्तरीय फळबाग जंगल पाळेकर माॅडेल: लेखांक क्र. 7

मित्रांनो, ज्यांचेकडे आवश्यक पाणी व कष्ट करण्याची क्षमता आहे, त्यांनी हे माॅडेल उभे करण्याचा निर्णय घ्यावा. ह्यात दिलेले सर्व तंत्र आपल्या चळवळीच्या हिम्मतबाज मित्रांचे शेतावर आम्ही सिद्ध केलेले आहे , व मागील लेखात मी त्यांचे फोन नंबरसुद्धा दिलेले आहे. काहींनी विचारले की माझे शेतावर हे माॅडेल कां घेतले नाही ? कारण माझी शेती कोरडवाहू आहे. पाण्याशिवाय हे माॅडेल आपण घेऊं शकत नाही. हे माॅडेल कोरडवाहू शेतीत घेता येईल काय, ह्यावर मी पुढील वर्षी काम चालूं करणार आहे. काही मित्रांनी ह्या माॅडेलवर आक्षेप घेतला की मी हे माॅडेल तरूण शेतकर्‍यांना देऊन त्यांना घोर संकटात टाकतो आह व त्यांचे भविष्य बरबाद करतो आहे. ते आक्षेप घेणारे माझेच जुने सहकारी आहेत,ज्यांचेवर मी मुलासारखे प्रेम केले आहे व आजही करतो आहे. मित्रांनो, ह्या माॅडेलमध्ये कोणतीही जोखीम नाही. नारळ सर्व महाराष्ट्रात विदर्भातसुद्धा उत्तम फळ देत आहे. आपल्या चळवळीचे एक सेनापती श्री.शरद शिंदे मु.मोडनिंब ता.माढा जि.सोलापूर 9028598955  ह्यांचे कडे उंच बाणावली नारळाची दहा बारा वर्षाआधी लावलेली रोपे आता जीवामृतावर दरवर्षी प्रति झाड 150 ते 200 नारळ फळांचे उत्पादन देतात असे त्यांनी मला सांगितले. पांचव्या सहाव्या वर्षापासून नारळाचे व्यापारी उत्पादन सुरूं होते,एका नैसर्गिक नारळ फळाची बाजारातील कमीत कमी किंमत 20 रूपये आहे. म्हणजे एक नारळाचे झाड दर वर्षी कमीतकमी 3000 रुपये उत्पन्न देते. आपण घरीच नारळापासून व्हर्जीन तेल , खाण्याचे तेल व नारळापासून नारळ दूध, बर्फी व ईतर पदार्थ तयार करणार आहोत. श्री,शरद शिंदे नारळचे तेल स्वताः घाण्यावर काढतात. कोकणात तर नैसर्गिक नारळ आपल्या उत्पादकांना कल्पवृक्षच ठरला आहे. आपल्या माॅडेलमध्ये नारळाचे एकरी 75 झाडे बसतात. म्हणजे एकरी दीड लाख ते सव्वा दोन लाख रुपये वर्षाला मिळणार आहे. बरं, नारळ उंच गेल्यामुळे त्याच्या खोडाएवढीच जागा त्याने घेतली. नारळ झाडाखालील संपूर्ण जागा त्यांने आपल्याला आंतरपिकासाठी उपलब्ध करून दिली. ह्या खाली जागेत आपण द्राक्षवेली व स्ट्राॅबेरी आच्छादनावर पसरविणार आहोत. मागील वर्षी जमिनीवर व आच्छादनावरील विराजमान झालेले नैसर्गिक द्राक्षाचे सुंदर घड शिवार फेरीत माझ्यासोबत आलेल्या 650 द्राक्ष उत्पादकांनी बघितलेत व ह्यावर्षी सुद्धा आपण पुढील फेब्रुवारीत होणार्‍या शिवार फेरीत बघणार आहोत. नारळावर काळी मिरी पांच वर्षानंतर लावणार आहोत. काळी मिरीची सख्खी बहीण औषधी पानपिंप्री विदर्भातील अति उष्णतामानाच्या अमरावती व अकोला जिल्ह्यात जीवामृतावर सुंदर उत्पादन देत आहे.काळी मिरीला पर्याय म्हणून आपण पानपिंप्री घेणार आहोत.सुभाष पाळेकर नैसर्गिक शेती तंत्राने पानपिंप्रीचे उत्पादन घेणारे आमचे नैसर्गिक शेतकरी आहेत श्री.सागर नेमाडे अंजनगांव सुर्जी 9922897747, श्री.रुषीकेश गुजर व हेमंत बोडखे अकोट 9867992162, .हे नैसर्गिक पानपिंप्रीचे माॅडेल बघायला माझेसोबत शिवारफेरीत चारशे शेतकरी होते. आता मला सांगा ह्या माॅडेलमध्ये नारळ घेण्यात कोणती जोखीम आहे ?
     नैसर्गिक लिंबु जर बाराही महिणे सतत भरपुर उत्पादन देत असेल तर त्यात कोणती जोखीम आहे ? नारळ उंच गेल्यावर नारळाच्या फांद्यांची लिंबू झाडाला कोणतीही अडचण नाही. लिंबू झाडांच्या खालील फांद्या काढून टाकून लींबुच्या सर्वात खालच्या फांद्या  जमिनीपासून सहा फुटावर वाढतील ह्या हिशेबाने आकार देणार आहोत, म्हणजे फळे वेचायला व तोडायला कोणतीही अडचन येणार नाही. लिंबुच्या खालील सावलीत आच्छादनावर पानवेल पसरविणार आहो. ह्यावर्षी शिवारफेरीत आपण फळझाडाखाली पसरलेली व जावामृृतावर सुंदर उत्पादन देणारी पानवेल पाहणार आहोत. लिंबू फळापासून घरीच लिंबू चटणी व लोणचे तयार करुन आपल्या विक्री व्यवस्थेमार्फत ग्राहकांना विकून जास्त उत्पन्न मिळवणार आहोत. आता मला सांगा ह्यात कोणती जोखीम आहे ?
    आपण ह्या माॅडेलमध्ये नैसर्गिक शेवगा घेणार आहोत. शेवगा बाराही महिणे जीवामृतावर भरपुर उत्पादन व पैसा देतो. शेवग्याच्या शेंगा व ओली वाळली पाने ते पोषणमुल्यांनी व औषधी मुल्यांनी समृद्ध असल्यामुळे देशात विदेशात भरपूर मागणी व भाव आहेत. आता आठ दिवसाआधी केंद्रिय मंत्री श्री.नीतीन गडकरीसोबत झालेल्या भेटीत ते मला म्हणाले की सुभाष भाऊ आम्हाला नैसर्गिक शेवगा पाने शेकडो कंटेनर निर्यातीसाठी द्या , आम्ही पाहीजे तो भाव देऊ. पाणी शुद्धीकरणासाठी आता ब्लीचींग पावडरचे ऐवजी शेवग्याचे बियांची पावडर उत्तम आहे हे दिसून आल्यामुळे व ब्लीचींग पावडरचे अवशेष पिण्याचे पाण्यात येतात हे दिसून आल्यामुळे निकट भविष्यात शेवग्याचे बियांना प्रचंड मागणी येणार आहे, त्यासाठी आपण आतापासूनच तयार राहायला हवे. तसेच साग व शिसम आपल्या मुले नातवंडाची भविष्यकालीन बॅन्क ठरणार आहे. सागाचे खालील जागेचा उपयोग आपण द्राक्ष किंवा काळी मिरी घेण्यासाठी करणार आहोत. आता मला सांगा शेवगा व साग घेण्यात कोणती जोखीम आहे ?
    हादगाचे बी मागवून जुन जुलैमध्ये लाऊन द्या. पुढे आॅक्टोंबर मध्ये हादग्यापासून किंवा पांगार्‍यापासून एक फूट अंतरावर आपण बियांचे द्राक्षाचे छाटकलम लावणार आहोत व पुढे ती वेल हादग्यावर चढवणार आहोत व दोन वर्षांनी द्राक्षाच्या हादगा म्हणजेच हेटा झाडाचे आधाराने उभ्या असलेल्या द्राक्ष वेली आपल्या खोडावर भरपूर घड देणार आहेत. ह्यावर्षी द्राक्ष वेलीच्या खोडावर भरपुर लागलेले घड आपण माझ्यासोबत येणार्‍या जानेवारी फेब्रुवारी 2020 मध्ये शिवार फेरीत बघणार आहात. मग आपणाला कळेल की खरोखरच ह्यात कोणतीही जोखीम नाही.
    मी मागील लेखात म्हटले होते की दाळींब फळांना पाखरं खुप त्रास देतात व नुकसान होते. सीताफळ नाशिवंत फळ असल्यामुळे ताबडतोप विक्री व्यवस्था झाली नाही तर व प्रक्रिया खर्चिक आहे,त्यामुळे आपण ह्या माॅडेलमध्ये सीताफळ व दाळींबाचे जागी केळी घेणार आहोत. केळीची फळे पिकल्याशिवाय फळांना पाखरे व जनावरे खात नाहीत. आपण केळीचे घड झाडावर पिकू देत नाही, पक्वतापूर्व काळात हिरवीच फळे काढणार असल्यामुळे कोणतीही जोखीम नाही. नैसर्गिक केळीचे पीक रोग किडीला बळी पडत नाही व तीव्र उन्हाचा आपल्या केळीला तेवढा त्रास होत नाही. एकदा केळी लावली की सतत अनेक वर्ष आपण आपल्या पद्धतीत खोडवे घेऊ शकतो व एकाच खोडापासून सारख्याच वजनाचे दोन तीन घड घेत आहोत. सुभाष पाळेकर नैसर्गिक शेती पद्धतीत केळीचा सहावा खोडवा श्री.बुवासाहेब बागल व त्यांचा मुलगा महेंद्र बुवासाहेब बागल मु,मांडवखडक पो,निरगुडी ता,फलटण जीं.सातारा 9765051885,  9404506686,   7350765579 ह्यांचे फळबागेत उभा आहे, जाऊन खात्री करून घ्यावी. केळीवर प्रक्रिया उद्योग मी तुम्हाला दाखविणार आहे.
केळीचे नैसर्गिक पीक घेणारे आमचे शेतकरी, त्यांचेकडे केळीचे कंद उपलब्ध होऊं शकतात, त्यांचे पत्ते व फोन नंबर उद्याचे लेखांक नं.8 मध्ये देणार आहे.
धन्यवाद.