पंचस्तरीय फळबाग जंगल पाळेकर माॅडेल: लेखांक # 3

कृषी-ऋषी पद्मश्री सुभाष पाळेकर, अमरावती, महाराष्ट्र.
पंचस्तरीय फळबाग जंगल पाळेकर माॅडेल: लेखांक क्र. 3

मित्रांनो, ह्या माॅडेल मध्ये अनेक फळपिकांचे सहजीवी एकात्मिक संयोजन आहे. जमिनीची आडवी उभी मशागत करून जमीन उन्हात तापवू द्या.पुर्व पिकाचे अवशेष वेचून आच्छादनासाठी सुरक्षित ठिकाणी ढीग लावा किंवा रोटाव्हेटरने कुळवून ते अवशेष बारीक करून मातीत मिसळा. शेवटच्या कुळवणीचे पाळीआधी एकरी 400 किलो घनजीवामृत समप्रमाणात विस्कटून मातीत मिसळा. मान्सूनपूर्व पाऊस आल्यावर उगवून येणार्‍या तणांचा ऊत कुळवणीने मारुन टाका. मान्सूनला सुरुवात होताच तीन फुट बाय तीन फुट अंतरावर उभे आडवे सारे म्हणजे रेघा पाडून चौफुल्या तयार करा. एका एकरात एकूण 4840 चौफुल्या मिळतात.
    24 बाय 24 फूट अंतरावर उंच वाढणारे बाणावली म्हणजे वेस्ट कोस्ट टाॅल नारळाची जात लावा. ही नारळ जात  दोनशे वर्ष सुद्धा फळे देत असून फळांना जंगली जनावरे व माकडे खात नाही. नारळ झाड उंच असल्यामुळे आंतरपिकांना पाहीजे ती ऊन सावली मिळते, व झाडाखाली सहज आंतरपिके घेता येतात. नारळ झाड वर्षभर सतत उत्पादन देते, त्यामुळे हातात सतत पैसा खेळतो. नारळापासून घरीच खोबरे व नारळाचे तेल काढता येते व मुल्यवर्धन होते तसेक नारळ फळाचे सर्व अवशेष व ठराविक अंतराने गळून पडलेले पक्व नारळाची पाने आच्छादनासाठी उपलब्ध होतात. नारळाचे घरी तयार केलेले व्हर्जीन तेल खूप महाग असते, कारण ते शुद्ध असते. बाजारातील तेलाची कोणतीही हमी देता येत नाही. नारळाच्या ओल्या खोबर्‍यापासून दूध दही व तूप बनवता येते .नारळ महाराष्ट्रात सगळीकडे चांगला वाढतो , नारळांची एकरी 75 संख्या बसते.
    ह्या दर दोन नारळ झाडांचे  मध्ये नारळापासून बारा बारा फुटावर लींबू रोप लावा. लींबू फळांना सुद्धा जंगली जनावरे व माकड खात नाही व वर्षभर भरपूर उत्पादन व पैसा मिळतो. लिंबू दुष्काळांत सुद्धा टिकून राहतो. लिंबू प्रक्रिया घरी करता येते. लिंबुची एकरी 150 झाडे बसतात.
    दर चार नारळांचे मधोमध सेंटरला साग लावा. साग म्हणजे पुढील पिढीसाठी केलेली भरपुर व्याज देणारी गुंतवणूक आहे. साग सुद्धा उंच वाढत असल्यामुळे बाकीच्या आंतरपिकांना आवश्यक ऊनसावलीचा खेळ उपलब्ध करतो, लावणीपासून वीस वर्षांनी सागाचे खोडात   नक्षीकाम करण्यासाठी आवश्यक लाकूड दर्जा निर्माण होतो. सागाची पानगळ होऊन अनायसे आच्छादनासाठी काष्ट पदार्थ मिळतो. सागाची एकरी 75 झाडे बसतात. नारळ व साग लावल्यांनंतर पांच वर्षांनी त्यांच्या खोडापासून दीड फूट अंतरावर करीमुंडा ह्या देशी जातीच्या काळीमिरीचे रोप लावायचे व वेली नारळ व सागाचे खोडावर चढवणार आहोत. जेथे विड्याची पानवेल व पानपिपरी येते तेथे काळी मिरी हमखास येते. काळी मिरीला सावली व आधार पाहीजे.पानवेल महाराष्ट्रात सगळीकडे येते.
    प्रत्येक नारळ व लींबू ह्यांचेमध्ये मधोमध शेवगा लावा. एकरी शेवगा 150 झाडे बसतात. जून मध्ये शेवगा लावल्यानंतर दोन महिण्यानंतर सप्टेंबर मध्ये शेवग्यापासून एक फुटावर काळी मिरीचे रोप लावा व नंतर ह्या वेली शेवग्यावर चढवायच्या आहेत. नारळ व सागाचे खोडावर व शेवग्यावर चढविण्यासाठी काळी मिरीची एकूण एकरी 300 रोपे हवी आहेत.शेवगा व काळी मिरीला सुद्धा पक्षी व जंगली जनावरे खात नाहीत.
  लिंबू व साग ह्यांचे मधोमध देशी केळी लावा. देशी केळीचे एकरी 150 कंद हवेत. हिरव्या केळीला जंगली जनावरे व पाखरे खात नाही.तसेच ह्यातच आपल्याल्या सीताफळ लावायचे आहे,सीताफळाला सुद्धा जंगली जनावरे व माकड खात नाहीत. फक्त सीताफळ आंतरपीक म्हणून बारा बाय बारा फूट अंतरावर घेतले तर एकरी 600 झाडे बसतात. परंतु एकाआड एक सीताफळ व दाळींब लावले तर सीताफळाची एकरी 300 झाडे व दाळींबाची 300 झाडे बसतात.
    ह्या प्रत्येक दोन फळझाडामध्ये सहा बाय सहा फूट अंतरावर पांगारा किंवा हादगा म्हणजे हेटा बी किंवा रोप लावायचे  आहे. एकरी पांगारा किंवा हादगाची 1200 झाडे बसतात. जूनमध्ये पांगारा किंवा हादगा लावल्यानंतर चार महिण्यांनी आॅक्टोंबरमध्ये पांगार्‍यापासून किंवा हादग्यापासून एक फुटावर रेड ग्लोब, एआरआय 516 व अनाबेशाही जातीच्या बियाच्या द्राक्ष वेलींचे छाटकलम लावायचे आहेत. आम्ही ती उपलब्ध करून देऊं.
रोप लावणीचे ओळीनुरुप नियोजन— ह्या माॅडेल मध्ये दर तीन फूट अंतरावर रोपलावणीच्या ओळी येतात. 24 बाय 24  फूट अंतरावर लावलेल्या एका नारळाचे क्षेत्रात दर तीन फूटावर येणार्‍या आठ ओळी येतात. व प्रत्येक ओळीत दर तीन फुटावर रोप लावायचे आहे. त्याचे नियोजन पुढील प्रमाणे..,.
ओळ क्रमांक नं.1...मध्ये दर तीन फुटावर येणार्‍या चौफुल्यावर पुढील आठ प्रकारची रोपे लावायचे आहेत...
१)नारळ...२)पांगारा...३)शेवगा...४)पांगारा..५)लींबू...६)पांगारा.,.७)शेवगा...८)पांगारा..पुन्हा १)नारळ व पुढे हाच क्रम बागेच्या सीमेपर्यत सुरु राहील
ओळ क्रमांक 2— पहिल्या ओळीपासून खाली तीन फुटावर येणार्‍या ओळ नं.2 मध्ये प्रत्येक तीन फुटावर येणार्‍या प्रत्येक चौफुलीवर तुर अधिक अंबाडी अधिक चवळी अधिक बाजरा बी मिश्रण टोकायचे डोबायचे आहे.
ओळ क्रमांक 3 मध्ये..ओळ नंबर दोन नंतर खाली तीन फुटावर येणार्‍या ओळ नं. 3 मध्ये प्रत्येक चौफुलीवर अनुक्रमे पुढील आठ प्रकारची रोपे एकानंतर एक बागेची सीमा संपेपावेतो त्याच क्रमाने पुढीलप्रमाणे लावायची आहेत..
१)सीताफळ...२)पांगारा किंवा हादगा..३).दाळींब...४)पांगारा....५)सीताफळ...६)पांगारा....७)दाळींब....८)पांगारा....पुन्हा १) सीताफळ व पुढे हाच क्रम शेवटपर्यंत
ओळ क्रमांक 4— ओळ नं. तीन नंतर तीन फुटावर आलेल्या ओळ नं.4 मध्ये दर तीन फुटावर येणार्‍या प्रत्येक चौफुलीवर एका नंतर एक अशी आठ रोपे लावायची आहेत व पुढे हाच क्रम शेवटपर्यंत सुरु ठेवायचा आहे...तो पुढीलप्रमाणे...
प्रत्येक चौफूलीवर तूर अधिक अंबाडी अधिक चवळी अधिक बाजरा हे सर्व बी मिसळून बीजामृताचा संस्कार करून टोकायचे आहे.
ओळ क्रमांक 5... ओळ क्रमांक चार नंतर तीन फूटावर आलेल्या ओळ क्रमांक 4 मध्ये सुद्धा दर तीन फुटावरील प्रत्येक चौफुलीवर पुढील रोपे अनुक्रमें लावायची आहेत.तो क्रम पुढीलप्रमाणे आहे.,
१)लिंबू....२)पांगारा..,३)केळी...४)पांगारा...५)सागवान....६)पांगारा...७)केळी....,८)पांगारा.....व पुन्हा १)लिंबू व पुढील तोच क्रम बाग संपेपर्यंत.
ओळ क्रमांक 6--ओळ नं. 5 नंतर खाली तीन फुटावर आलेल्या ओळ नं. 6 मध्ये सुद्धा दर तीन फुटावर येणार्‍या प्रत्येक चौफुलीवर तूर अधिक अंबाडी अधिक चवळी अधिक बाजरा हे बी एकत्र मिसळून व बीजामृताचा संस्कार करून हे बी मिश्रण टोकायचे आहे..बागेच्या शेवटपर्यंत.
ओळ क्रमांक 7- ओळ क्रमांक 6 नंतर खाली तीन फुटावर आलेल्या ओळ नं.7 वर दर तीन फुटावर आलेल्या प्रत्येक चौफुलीवर क्रमाने आठ प्रकारची रोपे लावायची आहेत. तो क्रमपुढीलप्रमाणे..
१)सीताफळ....२)पांगारा.....३)दाळींब...४)पांगारा...५)सीताफळ.....६)पांगारा....७)दाळींब...८)पांगारा ......व नंतर पुन्हा 1)सीताफळ असा क्रम शेवटपर्यंत सुरू ठेवायचा आहे.
शेवटची ओळ क्रमांक 8— ओळ नं. 7 नंतर खाली तीन फुटावर येणार्‍या ओळ क्रमांक 8 मध्ये प्रत्येकी तीन फुटावर येणार्‍या प्रत्येक चौफुलीवर तूर अंबाडी चवळी बाजरा बी मिश्रण टोका.
पुढील मजकूर लेखांक नं.4 मध्ये येणार आहे.