पंचस्तरीय फळबाग जंगल पाळेकर माॅडेल: लेखांक # 15

कृषी-ऋषी पद्मश्री सुभाष पाळेकर, अमरावती, महाराष्ट्र.
पंचस्तरीय फळबाग जंगल पाळेकर माॅडेल: लेखांक क्र. 15

मित्रांनो, मी सध्या उत्तराखंड, पश्चिम उत्तर प्रदेश व हिमाचल प्रदेश ह्या प्रांतात शिबीरे, चर्चासत्र, चिंतन शिबीर व शिवार फेरी करतो आहे. उत्तराखंडची राजधानी डेहराडूनला झालेले माझे एक दिवसाचे शिबीर खूप यशस्वी झाले. माननीय मुख्यमंत्र्यांनी सुभाष पाळेकर नैसर्गिक शेती अभियान पूर्ण राज्यात युद्ध पातळीवर राबविण्यासाठी राज्याचे मुख्य सचिवाचे नेतृत्वाखाली एक राज्यस्तरीय समिती स्थापण केली ज्यात सदस्य म्हणून सर्व मंत्रालयांचे सचिव सदस्य आहेत.माननीय मुख्यमंत्र्यांसोबत माझ्या झालेल्या पत्रकार परिषदेने सर्व प्रसार माध्यमांनी व्यापक प्रसिद्धी दिली. हिमाचल प्रदेश, आंध्र प्रदेश व उत्तराखंड ह्या तीन राज्यांनी शेतकर्‍यांचे व जनतेच्या सर्वांगीन हीतासाठी आपले तंत्र अधिकृत सरकारी धोरण म्हणुन स्वीकारून तात्काल अंमलबजावणी सुरु केली आहे, हे आपल्या जन चळवळीला मिळालेले यश आहे. आज उद्या व परवा ता.22, 23, 24 जून 2019 ला उत्तरप्रदेशातील शामली, हापूड, मुझप्परनगर,व हस्तीनापूर जिल्ह्यांत तीन दिवसांची शिवार फेरी आहे, हरिद्वार व रुषीकेशला दर्शन व चिंतन बैठक आहे, नंतर दि. 26 जून 2019 ला उत्तराखंड कृषी विद्यापीठात होणार्‍या पदवी दान दिक्षांत समारोहात मुख्य पाहुणे म्हणून माझे भाषण आहे. नंतर दि.28 जून ते 3 जुलै 2019 दरम्यान माझे सहा दिवसांचे सोलन सीमला कृषी विद्यापीठात भव्य निवासी शिबीर हिमाचल सरकारने घेतले आहे, त्यानंतर हिमाचल प्रदेशात दि.5,  6, 7 जुलै 2019  दरम्यान माझ्या उपस्थितीत 100 % सुभाष पाळेकर नैसर्गिक शेती तंत्राने विकसित केलेल्या सफरचंदाच्या बागा व भाजीपाला माॅडेल शेतीवर तीन दिवसांची शिवार फेरी आहे ,ह्या शिवार फेरीत  हिमाचलचे माननीय राज्यपालजी व उत्तराखंड राज्याचे माननीय मुख्यमंत्री  माझेसोबत हा चमत्कार बघतील.
     आता महाराष्ट्रात मान्सूनने नाही नाही  म्हणता शेवटी आपली दया येऊन एकदाची पावसाला सुरुवात केली आहे. तेव्हा ताबडतोप माॅडेलची आखणी, खड्डे घेणे व खड्याजवळ जीवाणूमाती तयार करणे ही कामे सुरु करावी. ह्याबाबत सर्विस्तर माहिती मी ह्या आधीच्या लेखांकांत दिलेली आहेच. बी उगवून वर  येण्यासाठी आवश्यक भरपूर ओलावा जमिनीत साठलेला आहे ह्याचा अंदाज घेऊनच बियांना बीजामृताचा संस्कार करून बी टोकावे डोबावे. कमी ओलाव्यात बी टोकण्याचे अकारण धाडस करु नये, ते अंगावर येण्याची शक्यता असते. बी उगवून आल्यानंतर वाढणार्‍या रोपावर खालील वेळापत्रकानुसार जीवामृताच्या व कीडरोधक नैसर्गिक औषधांच्या फवारण्या कराव्यात.
     सतत खुरपणी, भांगलणी, निंदणी व कोळपणी म्हणजेच डवरणी करून तणांचा बंदोबस्त करावा, त्यात विनाकारण हलगर्जीपणा करू नये.  मुळात तणे मुख्य पिकाशी अन्नद्रव्ये घेण्याची स्पर्धा करतात हा कृषी विज्ञानाचा दावा खोटा आहे. तसे असते तर शेताचे बांधावर म्हणजे धुर्‍यावर व जंगलात मोठ्या झाडाखाली झुडुपे व गवताची रोपे वाढलीच नसती. परंतु आपण पाहतो की मोठ्या झाडांच्या सावलीचे मायेत झुडुपे व गवत छान वाढतात व मोठ्या झाडाला,झुडुपांना छान फळे लागतात, खालील गवताला छान दाणे लागतात. ह्याचा अर्थच हा आहे की कोणत्याही दोन झाडांमध्ये परस्पर अन्नद्रव्ये घेण्याची कोणतीही स्पर्धा नसते, उलट सहजीवन असते, एकमेकाला केलेली अन्नद्रव्यांची देवाणघेवाण असते. कोणत्याही झाडाची 98.5 % शरीर वाढ फक्त हवा, पाणी व सूर्यप्रकाशाने होते, हे तत्व आपण झाडांना देत नाही, ती ईश्वरीय व्यवस्था आहे. तेव्हा अन्न स्पर्धेचा प्रश्नच निर्माण होत नाही. मग तुमचे मनात प्रश्न निर्माण होईल की मी निंदन खुरपण कां सांगतो आहे ? ते ह्यासाठी की कोणत्याही दोन झाडांमध्ये ओलावा व सूर्यप्रकाश घेण्याची स्पर्धा असते. जागतिक तापमान वृद्धी व हवामानात होत असलेल्या घातक बदलामुळे ह्यापुढे हमखास पावसाची व आलाच तर तो वेळेवर येईलच ह्याची कोणीही हमी देऊं शकत नाही. त्यामुळे मिळालेल्या पावसाचा जमिनीत साठलेला ओलावा टिकवून ठेवणे व त्याला बाष्पउत्सर्जन क्रियेने हवेत उडून जाऊं न देणे ह्यासाठी मी निंदन खुरपण सांगतो आहे. ह्यासाठी सायकलचे चाक असलेले हाताने चालणारे हातकोळपे म्हणजे हातडवरे खुपच चांगले. ज्यांना हवे आहे त्यांनी आपली मागणी नोंदवावी म्हणजे त्यांना ती उपलब्ध होणार्‍या पत्यांची माहिती देता येईल. एकदल गवतासारखी तणे उपटुन तेथेच आच्छादन म्हणून मोकळ्या जमिनीवर टाकलीत तर त्यांच्या मुळ्या लगेच जमिनीला चिकटतात व पुन्हा ती जिवंत होतात. म्हणून अशी एकदल तणे उचलून बांधावर वाळण्यासाठी ढीग लावा. जाड पानांची व सोटमुळे असलेली द्वीदल तणे मात्र उपटुन त्यांचे रोपाभोवती आच्छादन करावे .कारण त्यांच्या मुळ्या पुन्हा जमिनीला चिकटत नाही व जिवंत होत नाही. पुढे एकदल तणे बांधावर म्हणजेच  धुर्‍यावर वाळली की त्यांना ह्या द्वीदल तणांचे आच्छादनावर टाकावे. काडीकचर्‍याचे काष्ट आच्छादन जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्याचे व हवेतील ओलावा जमिनीत साठवून रोपांचे मुळ्यांना उपलब्ध करण्याचे अभूतपूर्व महान कार्य करीत असते. तसेच हे आच्छादन कुजून ह्युमसची निर्मिती होऊन त्या ह्युमसचेद्वारे मुळ्यांना सर्व अन्नद्रव्ये पुरविण्याचे व हवेतील ओलावा खेचून रोपांना उपलब्ध करण्याचे महत्वपूर्ण काम होत असते.
रोपावर जीवामृताच्या फवारण्यांचे वेळापत्रक—ह्या फवारण्या मुख्य पिकावर व सोबतच आंतरपिकांवर व जमिनीवर एकाचवेळी कराव्यात.
पहिली फवारणी—बी पेरणीनंतर एक महिण्याने...एकरी 100 लिटर पाणी व 5 लिटर पातळ कपड्याने गाळलेले जीवामृत. म्हणजेच 15 लिटर पाणी व 750 मिली गाळलेले जीवामृत मिसळून फवारणी करावी.
दुसरी फवारणी— पहिल्या फवारणी नंतर 21 दिवसांनी दूसरी फवारणी...एकरी 150 लिटर पाणी व 10 लिटर  गाळलेले जीवामृत म्हणजेच 15 लिटर पाणी व 1 लिटर जीवामृत मिसळून फवारणी करावी.
तीसरी फवारणी— दुसर्‍या फवारणीनंतर 21 दिवसांनी तिसरी फवारणी करावी त्यासाठी एकरी 200 लिटर पाणी व 20 लिटर गाळलेले जीवामृत...म्हणजेच 15 लिटर पाणी व 1.5 दीड लिटर गाळलेले जीवामृत मिसळून फवारणी करावी
चवथी फवारणी—तीसर्‍या फवारणीनंतर 21 दिवसांनी चवथी फवारणी करावी. त्यासाठी एकरी 200 लिटर पाणी व 5 लिटर जुने आंबट ताक ..म्हणजेच 15 लिटर पाणी व 400 मिली जूने आंबट ताक मिसळून मारावे.
पांचवी फवारणी—चवथ्या फवारणीनंतर पंधरा दिवसांनी पांचवी फवारणी करावी. त्यासाठी एकरी 200 लिटर पाणी व 20 लिटर गाळलेले जीवामृत ,.म्हणजेच 15 लिटर पाणी व दीड 1.5 लिटर गाळलेले जीवामृत मिसळून फवारणी करावी.
त्या नंतरच्या जीवामृताच्या फवारण्या दर पंधरा दिवसांनी कराव्यात.— त्यासाठी एकरी 200 लिटर पाणी व 20 लिटर जीवामृत ..,म्हणजेच 15 लिटर पाणी व दीड 1.5 लिटर जीवामृत मिसळून झाडांना पहिली फळधारणा सुरु होईपर्यंत सतत दर पंधरा दिवसांच्या अंतराने फवारण्या कराव्यात.
जीवामृत जमिनीवर देणे
पावसाळ्यात दर पंधरा दिवसांनी जीवामृत जमिनीवर किती व केव्हा टाकावे तसेच कीडरोधक नैसर्गिक औषधांच्या फवारण्या केव्हा व कशा कराव्यात, ह्याचा संपूर्ण तपशिल पुढील लेखांक नं.16 मध्ये देणार आहे. धन्यवाद.