पंचस्तरीय फळबागजंगल पाळेकर माॅडेल: लेखांक # 5

कृषी-ऋषी पद्मश्री सुभाष पाळेकर, अमरावती, महाराष्ट्र.
पंचस्तरीय फळबाग जंगल पाळेकर माॅडेल: लेखांक क्र. 5

मित्रांनो,
रोपांची लावणी किंवा बी टोकणी(डोबणी)
लेखांक तीन मध्ये सांगितल्यानुसार आपण मशागत करून व शेवटच्या मशागतीआधी एकरी 400 किलो घनजीवामृत विस्कटून कुळवणीने(वखरणीने)मातीत मिसळून दिले असेल.नंतर मान्सून पूर्व पाऊस आल्यावर जमिनीतील तणांचे बियांना उगवून वर येवू द्या व रान बारक्या तणांनी हिरवे झाले की कुळवणीची पाळी पुन्हा एकदा देऊन तणांचा नायनाट करा.मान्सूनला सुरुवात झाली व पेरणीयोग्य पाऊस झाला की दर तीन फूट अंतरावर आडवे उभे सारे म्हणजे रेघा फाडून औरस चौरस चौफुल्या पाडून घ्या.एकरी एकूण 4840 किंवा दहा गुंठा शेतात एकूण 1210 चौफुल्या बसतात.
खड्डे खोदणे व भरणे—नंतर जेथे नारळ,लिंबू,साग,केळी,सीताफळ,दाळींब व हादगा किंवा पांगारा लावायचा आहे त्या दर सहा फूट अंतरावर येणार्‍या ओळीत प्रत्येक चौफुलीवर दीड फूट लांब दीड फूट रुंद व दीड फूट खोल ह्या आकाराचे खड्डे खोदून घ्या व त्यांना उन्हात चांगले वाळूं द्या. खड्यातील माती खड्याजवळच पण खड्यात माती परत येऊन पडणार नाही एवढ्या सुरक्षित अंतरावर टाकून तिचा ढीग लावा. जर जमीन खोल काळी चिक्कन पाणी धरून ठेवणारी असेल तर प्रति ढीग दोन ओंजळ कच्चा मुरुम किंवा दोन ओंजळ वाळू त्या ढीगावर टाका. परंतु जर जमीन हलकी मुरमाड दगडी असेल तर प्रति ढीग एक ओंजळ तलावातील किंवा शेततळ्यातील गाळ त्या ढीगावर टाकावा. नंतर प्रति ढीग दोन ओंजळ घनजीवामृत त्या ढीगावर टाका. तसेच शक्य असेल तर प्रति ढीग  एक ते दोनं ओंजळ वाळलेल्या पालापाचोळ्याचा चुरा किंवा त्याऐवजी  सोयाबीन किंवा हरभरा किंवा तूर किंवा मूंग उडीद ह्या कडधान्य पिकाचे कुटार बारीक करून त्या ढीगावर टाका. सोबतच प्रति ढीग 500 मिली जीवामृत त्या ढिगावर टाका. नंतर पावड्याने हे मातीचे संमिश्रण आडवे उभे तोडून चांगले मिसळून घ्या व तो ढीग कमीतकमी अठ्ठेचाळीस तास आंबवणीसाठी ठेवा. दोन दिवसानंतर ही अतिशय सुंदर जीवाणूसमृद्ध जिवंत नर्सरी माती तयार होईल.
रोपांची किंवा कलमांची लावणी व बी टोकणी ( डोबणी)
कोणत्याही फळझाडांची रोप किंवा कलम लावणी किंवा मिरची रोप लावणी भर पावसाच्या जून जुलै मध्ये लावूं नये, तर आश्लेषा नक्षत्रात म्हणजेच ठोकळ मानाने आगष्ट महिण्याचे दुसर्‍या पंधरवाड्यात करावी. तोपर्यंत मोठ्या पावसाचा भर ओसरलेला असतो व जमिनीत अनंत कोटी जीवाणूंच्या सर्वोत्तम हालचाली सुरु झालेल्या असतील, तसेच रोपांच्या मुळ्यांना नवीन मातीशी जुळवून घेण्यासाठी आवश्यक सूक्ष्म पर्यावरण व वाफसा मुळ्यांचे सान्नीध्यात निर्माण झालेले असेल. मात्र काळी मिरी किंवा औषधी पान पिंपरीची लागवड सूर्याच्या पावसाळी दक्षीणायनण भ्रमण काळात न करता सूर्याचे उत्तरायण भ्रमण काळाचे प्रथम सत्रात म्हणजेच मकर संक्रांत 14 जानेवारी ते फेब्रुवारीत येणार्‍या रथसप्तमी ह्यांचे दरम्यानचे काळात करावी.त्या काळात काळी मिरी किंवा पान पिंपरीची फळकाढणी संपलेली असते व आपल्याला लावणीसाठी छाटकलम सहज उपलब्ध होतात.
      नारळ, दाळींब,साग,ह्यांची रोपे व केळीचे कंद ह्यांची लावणी करतांना प्लॅस्टीक पिशवी फाडून बाजूला करावी.नंतर कलम किंवा रोप डाव्या हातात पकडून ते खड्यात अशा तर्हेने धरावे जेणेकरुन रोपांच्या मुळ्या खड्याचे मधोमध लटकत राहतील. नंतर उजव्या हाताने मग्ग्यात बीजामृत घेऊन ते बीजामृत रोपांच्या मुळ्यांवर शिंपडावे. नंतर मग्गा खाली ठेऊन उजव्या हाताने ढीगातील नर्सरी माती खड्यात मुळ्यांच्या सभोवती टाकावी व खड्डा भरून घ्यावा. नंतर दोन्ही हातांनी खड्डा चांगला दाबून घ्यावा. माती भरतांना खोडाजवळ जमिनीच्या पातळीपेक्षा चार बोटे म्हणजे तीन इंच उंचवटा येईल व बाहेरचे बाजुला उतार निघेल अशा रितीने भरावा, जेणेकरुन पडणारे पावसाचे पाणी किंवा सिंचनाचे पाणी रोपाच्या खोडाजवळ थांबून खोड व मुळ्या सडणार नाहीत व रोपे मरणार नाही, मुळ्यांजवळ सुंदर वाफसा निर्माण होऊन रोपे जोमदारपणे वाढायला लागतील. नंतर त्या रोपासभोवतीच्या मातीवर झारीने जीवामृत शिंपडा व भरलेली माती साडेचार इंच म्हणजे सहा बोटे जाडीच्या काष्ट आच्छादनाने झाकून टाका.
 आच्छादन कां झाकावे ?
रोपलावनीनंतर मुळ्यांना ह्या नविन सावत्र माती आईशी जुळवून घेण्यासाठी व माती आणि मुळ्या ह्यांच्यात अन्नद्रव्यांचे आदाणप्रदाण सहजीवन सुरु होण्यासाठी आवश्यक सूक्ष्म पर्यावरण हे आच्छादनाने लवकर निर्माण होते. पावसाचे प्रति सेकंद तीस फूट वेगाने येऊन मातीवर आदळणारे  पावसाचे थेंब मातीत खड्डे पाडतात. परिणामी रोपांच्या मुळ्या उघड्या पडतात व सुपीक नर्सरी माती पावसाने वाहून जाते व रोपांची वाढ खुरटते. आच्छादनाने पावसाचे थेंब जमिनीला स्पर्ष करीत नाही, परिणामी मुळ्या उघड्या पडत नाहीत व माती वाहून न जाता सुरक्षित राहते. आच्छादन मुळ्यांचे व मातीतील अनंत कोटी उपयुक्त सूक्ष्म जीवाणुंचे वादळी वारा, प्रखर उन्ह,उष्णतेच्या किंवा थंडीच्या लाटा, पाऊस, गारपीट, कीटक, पक्षी ह्या बाह्य शत्रुंपासून संरक्षण करते. वेगाने येणारे पावसाचे थेंब आच्छादन नसेल तर मातीवर वेगाने आदळून जेव्हा वर उसळतात तेव्हा त्या थेंबात थेंबांसोबत वर उसळलेले मातीचे कण विरघळतात व मातीसहित ते थेंबाचे पाणी रोपांच्या खालील पानांवर पडतात तेव्हा तो मातीचा गाळ पानावर जमा होतो. परिणामी पाने सडतात व त्यांची प्रकाशसंश्लेषणाने होणारी अन्न निर्मिती थांबते व शेवटी पाने सुकून गळून पडतात. आच्छादनाने थेंबांचा संबंध मातीशी न आल्यामुळे हे होणारे संभाव्य नुकसान टळते. मातीतील तणांच्या बिया उगवून वर आल्यावर त्यांच्या अंकुरांच्या वाढीसाठी सूर्य प्रकाशाची आवश्यकता असते. सूर्य प्रकाश उपलब्ध झाला नाही तर अंकूर पिवळे पडतात व शेवटी सुकून मरतात. रोपाजवळील तणे उगवून आल्यानंतर लावणी केलेल्या फळझाडांच्या रोपांशी ओलावा व सूर्यप्रकाश मिळविण्यासाठी जीवघेणी स्पर्धा करतात.परिणामी तणे वेगाने वाढून नवजात रोपांना झाकून टाकतात. त्यामुळे रोपांना सूर्यप्रकाश न मिळाल्यामुळे रोपांची वाढ खुंटते, रोपे कमजोर बनतात व शेवटी कीडी रोगांना बळी पडतात. आच्छादनाने ह्या तणांच्या अंकुरांना सूर्य प्रकाश मिळत नाही, परिणामी त्यांची वाढ खुंटून तणे पिवळी पडतात व शेवटी आच्छादनाखालीच सुकून मरतात व तणांचे नैसर्गिक नियंत्रण आपोआप होते. आच्छादन एक अदभूत नैसर्गिक तणनाशक आहे. आच्छादन व जीवामृत ह्यांच्या संयुक्त कुजण्याचे क्रीयेतून जमिनीला सुपीक व उत्पादक बनविणार्‍या ह्युमसची म्हणजे जीवनद्रव्याची निर्मिती होते.ह्या ह्युमसमधूनच रोपांच्या मुळ्यांना रोपांच्या  वाढीसाठी लागणारी सर्व अन्नद्रव्ये,सेंद्रिय आम्ले,ह्युमिक आम्ले व वाढसंवर्धके growth hormones सहज नैसर्गिकरित्या उपलब्ध होतात. आच्छादनाने जमिनीत देशी गांढुळांच्या हालचालीसाठी आवश्यक सूक्ष्म पर्यावरण आपोआप निर्माण होते व मग ही गांडुळे जमिनीची नैसर्गिक मशागत करतात, जमीन सच्छिद्र करून पावसाचे संपूर्ण पाणी त्या छिद्रांद्रारे जमिनीत जिरवतात व त्यांच्या विष्टेच्या माध्यमातून रोपांना अन्नद्रव्ये उपलब्ध करतात.
   बाराही महिणे भरपूर फळे लागणार्‍या व फळात भरपूर रस असलेल्या पातळ सालीच्या गावरानी निरोगी सशक्त लिंबू झाडांची बियासाठी निवड करून झाडावरच पिकलेली फळे गोळा करा. नंतर फळे भुक्कीने फोडून किंवा हळुवारपणे कापून लिंबू फळाचे दोन भाग करा. फळातून बी वेगळे करा व उन्हालगतच्या सावलीत ते बी सुकवा. ज्यावेळी बी लावायचे आहे त्यावेळी बियांना बीजामृतात दहा मिनिटे भिजवा व नंतर काढून जेथे लिंबू झाड उभे करायचे आहे त्या जागी हे बी लावायचे आहे. रोपवाटिकेतुन रोपे विकत आणूं नका, त्या रोपांचे सोटमूळ नर्सरीतच तुटलेले असल्यामुळे नर्सरीची रोपे लावल्यानंतर ती लिंबूची झाडे दुष्काळात जगत नाहीत मरतात व वादळात उन्मळून पडतात व तोपर्यंत केलेली मेहणत व आर्थिक गुंतवणूक मातीमोल होते. तेव्हा चुकुन नर्सरीची रोपे लावूं नका. आधी खड्डा ढीगातील नर्सरी मातीने पूर्ण भरून घ्या व हाताने दाबून घ्या. खड्डा भरतांना माती थोडी जमीन पातळीचे वर येऊ द्या.नंतर पावसाळा सुरु होताच बी त्या दर दोन   नारळ झांडांचे मध्यभागी दोन्ही दिशांनी नियोजित चौफुलीवर टोका डोबा व लगेच त्यावर आच्छादन झाका व झारीने एवढे पाणी शिंपडा की पाणी आच्छादनातून घुसून मातीत झिरपेल जेणेकरुन बीयाला अंकुरण्यासाठी आवश्यक ओलावा उपलब्ध होईल व अतिरिक्त पाणी गुरुत्वाकर्षण शक्तीच्या दाबाने शेजारच्या नालीत उतरून मुळ्यांजवळ वाफसा निर्माण होईल.ज्यावेळी बी उगवून येण्याचे स्थितीत येईल त्यावेळी आच्छादन अंकूर वर यावा म्हणून हटवा. बी उगवून रोप वाढायला लागले की पुन्हा रोपाभोवती आच्छादन झाका.
   नारळाचे रोपासाठी सर्वोत्तम बी फळाची निवड आवश्यक असते. त्यासाठी 35 वर्षाचे वरील वयाचे नारळ झाड निवडावे. ही नारळाची सर्वात उत्तम पुनरोत्पादक अवस्था असते.ज्या नारळ झाडाचा आकार छत्रीसारखा गोलाकार आहे, पाने रूंद व हिरवीगार आहेत, खोडाचा बुंधा जाड रुंद मजबूत आहे, सर्वात जास्त घडांची संख्या आहे व प्रति घड नारळांची संख्या जास्तीत जास्त आहे, फळगळ नाही, झाडावर कीड नाही रोग नाही, सशक्त व निकोप आहे, अशा झाडांची निवड करून त्या निवडलेल्या सर्वोत्तम झाडांना ओळख म्हणून लाल धागा बांधा व खोडावर वार्नीसने निवड नं. 1 किंवा 2 असे नंबर द्या व तशी नोदवहीत नोंद घ्या. नारळ काढण्यासाठी घड तोडूं नका. घड तोडला तर 40 % पूर्ण पकलेले व ईतर अपरिपक्व फळे मिळतात. झाडावर फळ नैसर्गिकरित्या पकले की ते पक्व फळ आपोआप जमिनीवर गळून पडते.आपण फक्त गळून पडलेले पक्व फळे वेचायची व सुरक्षित ठिकाणी साठवायची आहेत. नंतर ह्या साठविलेल्या फळातून पुन्हा एकदा पूर्णपणे पकलेल्या व सर्वोत्तम दर्जाची फळे बियासाठी निवडायची व बीजामृतात दहा मिनिटे बुडवून नर्सरीत लावायची.
     केळीचे कंद थेट केळी झाडापासून घ्या. ऊती संवर्धित म्हणजे टिश्यू कल्चरची रोपे कधीच वापरुं नये. एकतर ही रोपे दरवर्षी विकत घ्यावी लागतात, आपला खिसा आपणच कापतो.दुसरी गोष्ट म्हणजे खोडवा घेऊं शकत नाही. तिसरे कारण म्हणजे ईश्वरीय व्यवस्थेच्या विरोधात आहे. मानवाने जर आपल्या शरीराच्या ऊती काढून त्या प्रयोगशाळेत संवर्धित करून त्यापासून बाळ निर्माण केले तर विवाह, कुटुंब व नाती ही प्रचलित व्यवस्थाच नष्ट होईल. चवथे कारण म्हणजे टिश्यु कल्चर केळीवर पर्णगुच्छ, करपा व अन्य रोग येत नाही हा दावा खोटा ठरलेला आहे. ज्या गावरानी किंवा ठेंगू कॅव्हेंडीश किंवा मध्यम उंचीची जी नाईन जातीसारखी रोबस्टा जातीच्या खोडाचा बुंधा भरपुर रुंद मजबूत भरदार आहे, पाने रुंद व हिरवीगार आहे, कीडरोग नाही निकोप आहे, घड सर्वात मोठा व जास्त वजनाचा आहे, बाजारात जास्त मागणी आहे व भाव जास्त आहे अशा  झाडांचे 400 ते 800 ग्रॅम वजनाची नारळाचे आकाराची तांबड्या चमकदार सालीचे  कंद बेण्यासाठी निवडावे.कंद बीजामृतात बुडवून लावावे.