पंचस्तरीय फळबाग जंगल पाळेकर माॅडेल: लेखांक # 16

कृषी-ऋषी पद्मश्री सुभाष पाळेकर, अमरावती, महाराष्ट्र.
पंचस्तरीय फळबाग जंगल पाळेकर माॅडेल: लेखांक क्र. 16

मित्रांनो, काल दि.24 जून 2019 ला संपलेल्या पश्चिम उत्तर प्रदेशातील पांच जिल्ह्यात आयोजित तीन दिवसांच्या सुभाष पाळेकर नैसर्गिक कृषी तंत्राद्वारे विकसित केळी, पेरु,शेवगा,आंबा, लिची,ऊस,भाजीपाला, मिरची ईत्यादि पिकांच्या माॅडेल शेत पाहणी शिवारफेरीला पांच राज्यातील शेतकरी ,शास्रज्ञ व प्रसारमाध्यम प्रतिनीधींचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. सर्वच मिडीयाने मोठे प्रसारण केले. उपस्थितामध्ये 90 % तरुण शेतकरी होते, ज्यातील 50 % तरुण शेतकर्‍यांनी यु ट्युब मधून माझे शिबीराचे व शिवार फेर्‍यांचे व्हीडीओज बघून नैसर्गिक शेतीला सुरुवातही केली होती. गम्मत म्हणजे त्यांनी माझे शिबीर ऐकले नव्हते. ह्याचा अर्थ हा की आपले जन आंदोलन शेतकरी व शहरी ग्राहकांपर्यंत पोहोचण्यामध्ये सामाजिक माध्यमांची म्हणजे सोशल मिडीयाची मोठी भूमिका आहे. ! का ? कारण, ती ईश्वरीय ईच्छा आहे,काळाची गरज आहे, कोणी मानो किंवा न मानो ! असो.
फळझाडांना जीवामृत कसे द्यावे 
जीवामृत हे खत नसून अनंत कोटी उपयुक्त सूक्ष्म जीवाणूंचे सर्वोत्तम विरजण आहे. कोणतेही खत हे कोणत्याही पिकाचे कींवा फळझाडाचे अन्न नाही. त्यामुळे वरून खत टाकण्याचा प्रश्नच येत नाही. जीवामृताद्वारे आपण जमिनीत ह्युमस निर्माण करणारे अनंत कोटी सूक्ष्म जीवाणू सोडतो. हे जीवाणू मग ह्युमस निर्माण करून मुळ्यांना जे जे अन्नद्रव्य पाहीजे ते ते अन्न ह्युमसचे माध्यमातून मुळ्यांना मानवाच्या उपस्थितीशिवाय उतलब्ध करण्याचे महान कार्य करतात. अशा ह्या सूक्ष्म जीवाणूंच्या सर्वोत्तम कार्यासाठी जमिनीचे वर व जमिनीचे आत मुळ्यांच्या सान्निध्यात एका सुक्ष्म पर्यावरणाची आवश्यकता असते. हे सुक्ष्म पर्यावरण उपलब्ध असेल तरच जीवाणू ह्युमस निर्मितीचे कार्य करतात, परंतु उपलब्ध नसेल तर मात्र हे जीवाणू ह्युमस निर्मिती करीत नाहीत, चक्क समाधी घेऊन सुप्तावस्थेत dormancy जातात. काय आहे हे सूक्ष्म पर्यावरण ?
   सूक्ष्म पर्यावरण म्हणजे जमिनीचे वर दोन झाडांच्या दरम्यान वाहणार्‍या हवेचे दिवसाचे तापमान 24 ते 36 अंश शतांश असावे, त्या हवेतील आर्द्रतेचे प्रमाण 65 ते 72 % असावे, सूर्यप्रकाशाची तीव्रता 5000 ते 7000 फूट कंन्डल असावी व जमिनीचे आत मूळ्यांचे सान्निध्यात अंधार वाफसा स्थिती असणे, ह्या एकुणच एकात्मिक स्थितीला  सूक्ष्म पर्यावरण म्हणतात. हे सूक्ष्म पर्यावरण सूर्याचे दक्षिणायण भ्रमण काळात आपोआप निर्माण होते. हा काळ आहे..21 जून ते 20 डिसेंबर. हाच काळ झाडांच्या सर्वोत्कृष्ट वाढीचा काळ असतो व तो नैरुत्य व ईशान्य मान्सूनचा काळ असतो . म्हणजेच पावसाळ्याचा काळ असतो. ह्याचा अर्थ हा आहे की आपण रासायनिक शेतीने झालेल्या  निर्जीव जमिनीत ती पुन्हा पूर्णपणे सजीव बनविण्यासाठी पावसाळ्यात जेवढे जास्तीत जास्त जीवामृत जमिनीला पाजू, तेवढ्या जास्त वेगाने जमीन सजीव होईल व तेवढ्याच जास्त वेगाने जमिनीत ह्युमसची निर्मिती होऊन जमिनीची सुपीकता व उत्पादनक्षमता सुध्दा त्याचवेगाने वाढेल. तेव्हा पावसाळ्यात जमिनीत जीवामृत जेवढे जास्त प्रमाणात देणे शक्य आहे तेवढ्या जास्त प्रमाणात द्यावे, अजिबात कंजुषी करू नये. आम्ही केलेल्या तुलनात्मक अभ्यास प्रयोगात दिसून आले की जीवामृत जमिनीवर टाकणे व सिंचनाचे पाण्यातून देणे ह्या दोन   प्रयोगात सिंचनातून दिलेल्या जीवामृताचा परिणाम कमी मिळाला, परंतु पावसाळ्यात फळझाडांच्या दोन ओळीत किंवा दोन फळझाडांत जमिनीवर टाकलेल्या जीवामृताचा परिणाम फळझाडांच्या  वाढीवर व उत्पादनावर तुलनात्मक खुपच चांगला व चमत्कारिक मिळाला. ह्यात कष्ट आहेत. परंतु हे माॅडेल ज्यांचे संपूर्ण कुटुंब फक्त शेतीउत्पन्नावर उभे आहे,ईतर कोणतेही आर्थिक स्रोत म्हणजे नोकरी किंवा व्यापार नाही, नोकरी मिळण्याची स्वप्नातही शक्यता नाही, तसेच ज्यांची कष्ट करण्याची अंतरिम तीव्र ईच्छा आहे व जो हे कार्य ईश्वरीय आध्यात्मिक कार्व आहे असे मानतो अशाच  आध्यात्मिक वृत्तीच्या तरूण शेतकरी मित्रांनी हे माॅडेल उभे करावे. नोकरी किंवा व्यवसाय करून रिकाम्या वेळात शेती करणार्‍यांनी चुकुनही हे माॅडेल उभे करण्याचे भानगडीत पडूं नये. कारण ते एकाचवेळेला दोन्हीकडे पूर्ण अपेक्षित न्याय देऊं शकत नाही.
जमिनीवर वरून जीवामृत केव्हा व किती द्यावे ?
रोप लावणी किंवा बी टोकणीनंतर पहिल्या सहा महिण्यात—जीवामृत एकाचवेळी नारळ,लिंबू,केळी,शेवगा व हादग्याला पुढील प्रमाणे द्यावे.
प्रति रोप 200 मिली जीवामृत महिण्यातून दोन तीन वेळां झाडाचे दुपारचे सावलीचे सीमेवर किंवा दोन झाडांच्या मधोमध जमिनीवर टाकावे. त्यावर माती टाकूं नये,उघडेच ठेवावे. जमीन जीवामृताला ताबडतोप शोषून घेते.
रोप लावणीनंतर किंवा बी टोकणीनंतर दुसर्‍या सहामाहीत  म्हणजे वर्षाच्या उत्तरार्धात व त्यानंतर सुद्धा वाढीचे काळात नेहमीसाठी जीवामृत किती व कसे द्यावे?
प्रति झाड 500 मिंं.ली.जीवामृत महिण्यातून दोन तीन वेळां दोन झाडांचे मधोमध जमिनीवर टाकावे. ही जीवामृत देण्याची प्रक्रिया ह्याच जीवामृत प्रमाणात जोपावेतो फळबाग उभी आहे तोपावेतो चालूं ठेवावी.
सिंचनाचे पाण्यातून जीवामृत किती द्यावे ?
सिंचनाचे पाण्यातून प्रति एकर 400 ते 600 लिटर जीवामृत महिण्यातून दोन किंवा तीन वेळां प्रत्येक पाण्यातून ह्याच प्रमाणात द्यावे.जीवामृत पातळ कापडाने प्रथम गाळून घ्यावे व नंतर पाण्यातून द्यावे. ठीबक किंवा तुषार सिंचन असेल तर जीवामृत गाळूनच वेंचुरीचे माध्यमातून द्यावे.
  एक बैल ओढेल अशी बैलबंडीची व्यवस्था करावी. बैलबंडीत दोनशे लिटर क्षमता असणारे दोन ड्राम म्हणजे बंरल एकाला लागून एक असे आडवे ठेवावे. बॅरलला वरच फक्त तोंड छिद्र जीवामृत ओतण्यासाठी असावे व बाकी छिद्र नसावे. नंतर डावीकडील ड्रामला खाली डाव्या बाजुकङील फळझाडाकडील बाजुला जीवामृत सोडण्यासाठी एक छिद्र पाडून त्यात प्लॅस्टीक नळ व त्या नळाला तोटी बसवावी. तसेच दुसर्‍या ड्रामला खाली उजव्या बाजुकडील फळझाडाकडील बाजुला जीवामृत सोडण्यासाठी बुडात एक छिद्र पाडून त्यात प्लॅस्टीक नळ व त्या नळाला तोटी बसवावी. दोन्ही ड्राम गाळलेल्या जीवामृताने भरून घ्यावे. जसा बैल किंवा हल्या किंवा गाढव प्राणी बंडी ओढणे सुरु करेल, ताबडतोप दोन्ही ड्रामच्या तोट्या हळूच थोड्या फिरवाव्या की आपोआपच फळझाडांच्या दोन्ही ओळीला जमिनीवर जीवामृत निश्चित केलेल्या धारेने पडत जाईल. जीवामृत हाताने द्यायचे असेल तर डाव्या हातात बकेटमध्ये जीवामृत घेवून उजव्या हाताने मग्ग्याचे सहाय्याने दोन झाडांचे मधोमध जमिनीवर ओतावे. किंवा पाठीवरचे पंपाचे टाकीत गाळलेले जीवामृत भरून हॅन्ढलचे नोझल काढून टाकावे व जमिनीवर हॅन्डलने जीवामृत जमिनीवर टाकावे.गाळलेले जीवामृत साठलेल्या टाकीतून मड पंपाने उचलून लांब नळ्याद्वारे जमिनीवर दोन फळझाडांचे मधोमध पाहिजे त्या प्रमाणात टाकता येते. फवारणी पंपाने जीवामृताची थेट फवारणी दोन ओळीमधील व दोन फळझाडांमधील रिकाम्या जमिनीवर सुद्धा करावी. ज्या ज्या मार्गाने जीवामृत जमिनीला भरपूर प्रमाणात पाजता येईल त्या त्या मार्गाने पाजावे. धन्यवाद.