पंचस्तरीय फळबाग जंगल पाळेकर माॅडेल: लेखांक # 2

कृषी-ऋषी पद्मश्री सुभाष पाळेकर, अमरावती, महाराष्ट्र.
पंचस्तरीय फळबाग जंगल पाळेकर माॅडेल: लेखांक क्र. 2

मित्रांनो, लेखांक नं 1 वाचून मोठ्या संख्येत माॅडेल करु ईच्छिणार्‍यांची नावे व पत्ते आलेत, तर काही चांगल्या सुचना आल्यात. तसेच सोबतच सोशल मिडियावर दिवसभर
 ठाण मांडून बसणार्‍या रिकामटेकड्या टिंगलटवाळ्या करणार्‍या  टवाळखोर मित्रांच्या मजेशिर काॅमेंट्स व सल्ले सुद्धा आलेत ! एक म्हणाला एकरी सहा लाख रुपये उत्पन्नाचे स्वप्न दाखवणे बंद करा, ते पुर्ण होणे कदापी शक्य नाही. दुसरा असाच एक रासायनिक शेतीचा मीशन म्हणून प्रचार करणारा पी एच डी धारक कृषी शास्रज्ञ व एक असाच खर्‍या खोट्याची शहानीशा न करता व बोलावूनही शिवारफेरीत येण्याची हिम्मत नसणारे पण सेद्रिय शेतीची खते व सेंद्रिय औषधे विकणारे मित्र म्हणाले की रासायनिक खते वापरल्या शिवाय तसेच त्यासोबत पुरक खते म्हणून बाजारात मिळणारी सेंद्रिय खते व सेंद्रिय औषधे वापरल्याशिवाय व त्यासोबतच रासायनिक कीटकनाशके बुरशीनाशके संजीवके वापरल्या शिवाय द्राक्ष, भाजीपाला व पाॅली हाऊस मध्ये विदेशी रंगीत ढोबळी मिरची येऊच शकत नाही.  माझे ह्या सर्व विरोधक मित्रांना नम्रपणे सांगणे आहे की मी प्रयोगाने सिद्ध झाल्याशिवाय व प्रत्यक्ष त्या तंत्राचे आदर्श माॅडेल उभे केल्याशिवाय कोणतेही तंत्र शेतकर्‍यांना देत नाही. एकरी सहा लाखाचे उद्दिष्ट व बारा लाखाचे स्वप्न आम्ही विकत नाही, आम्ही स्वप्ने बघतो व जीवापाड प्रयत्न करून ते स्वप्न साकार करतो.मी स्वप्न विकत नाही, मी शिबीराचे मानधन घेत नाही, देशभर निशूल्क सेवा देतो. तसेच जी स्वप्ने साकार करण्याचा प्रयत्न करतो त्यात कोणतीही जोखीम नसते. कारण हे माॅडेल उभे करण्यासाठी बाजारातून काहीही विकत आणावे लागत नाही. शेणखत नाही, कंपोष्ट नाही, गांढूळ खत नाही, रासायनिक खत नाही,ई एम सोल्युशन नाही, बायोडायनॅमिक खते नाही,गार्बेझ एन्झाईम नाही, अत्यंत खतरनाक वेस्ट डिकंपोझर नाही, बाजारातील विकायला आलेली अत्यंत महाग सेंद्रिय खते नाही, पेंडी नाही,नॅडेप खत नाही,तलावातील गाळ नाही,बकर्‍या मेंढ्यांची व गीर गाईंची शेतात बैठक नाही, बाजारातील सुक्ष्म अन्नद्रव्ये नाहीत, रासायनिक वा सेंद्रिय कीडनाशके व बुरशीनाशके नाही, काहीही वापरायचे नाही. तरीही 100 % सुभाष पाळेकर नैसर्गिक शेती तंत्राने उभे केलेले श्री.जनार्दन उत्तम पाटील मु.मंगसोळी ता.मिरज जिं.सांगली 7676147070, 9663779974 ह्यांची जी ए न वापरलेले अत्यंत यशस्वी नैसर्गिक द्राक्ष माॅडेल, श्री.जितेंद्र बाळासाहेब थेटे मु.नीमगांव जाळी तां .संगमनेर जि.नगर 8888139007,  7972437010 ह्या चांगल्या पगाराची ईंजिनियरची नोकरी सोडलेल्या ध्येयवेड्या शेतकर्‍याने  पाॅलीहाऊस मधील विदेशी रंगीत ढोबळी मिरचीचे अप्रतिम संपुर्ण 100 %सुभाष पाळेकर कृषीतून विकसित केलेले  अद्भूत माॅडेल , तसेच श्री.चिंतामणी घोले मु.हिंगणगांव ता.हवेली जि,पुणे 7620695509, 8275473071 ह्या तरूण शेतकर्‍याचे बाराही महिणे पुण्यातील ग्राहकांना थेट दलालमुक्त  विक्री व्यवस्था उभी असलेले अति सूंदर 100 % सुभाष पाळेकर कृषी तंत्राने विकसित सर्वच भाजीपाला माॅडेल असो,ही सर्व चमत्कार असलेली माॅडेल्स माझ्यासोबत शिवार फेरीत देशभरातून आलेल्या बाराशे शेतकर्‍यांनी बघितलीत.परंतु त्या शिवारफेरीत हे टिंगलटवाळी करणारे टवाळखोर मित्र चुकुनही आले नाहीत. आम्ही स्वप्ने विकत नाही, आधी बघतो व साकर करतो.
  पांगारा किंवा हादगा झाडाचे खोडावर द्राक्ष घेता येतात ? व तेही एक किलो लोखंड न वापरता ? कसे शक्य आहे? प्रयोग न करता शेतकर्‍यांना हे द्राक्ष माॅडेल कसे काय सांगता आहात ? हे प्रश्नसुद्धा ह्या अभ्यास न करता सरळ प्रश्न ठोकून देणार्‍या रिकामा वेळ सोशल मिडियावर घालवणार्‍या मित्रांचेच होते ! मी आधीच सांगितले की आम्ही अभ्यास व प्रयोग न करता काहीही बोलत नाही व शेतकर्‍यांना देत नाही. मी माझे शिबीरांच्या दरम्यान पुर्ण देशभर भटकंती करीत असतो, व  महाराष्ट्रात सुद्धा भटकंतीचे दरम्यान जुन्या जाणत्या शेतकर्‍यांना मुद्दाम भेटतो व त्यांचे काळांत पिकांची व शेतकर्‍यांची काय अवस्था होती ह्याची समीक्षा त्यांचेसोबत करतो. ह्या समीक्षे दरम्यान जुन्या काळातील कोणतेही लोखंड न वापरता पांगारा, वेळू किंवा हादगा झाडांचे खोडावर बियांची भोकरी अनाबेशाही सारखी द्राक्ष बागांचे वर्णन ऐकत होतो. मनात विचार येत होता की आता ते शक्य होईल काय ?  आपण प्रयत्न केले तर लोखंड न वापरता फक्त आधाराने उभ्या द्राक्ष वेलीचे खोडावर जमिनीपासून पांच फूट उंचीपावेतो सभोवताल फांद्या फोडता येईल काय हे तपासून पाहण्यासाठी सुभाष पाळेकर नैसर्गिक शेती तंत्राने शेती करणार्‍या सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यात  श्री.सुरेश चौगुले 9372980543 व सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील श्री.हीरगुप्पा कुंभार 9511240960 ह्या  द्राक्षउत्पादकांना असे प्रयोग मागील वर्षी दिले होते व ते प्रयोग 100 % यशस्वी झाल्याचे माझ्या सोबत शिवार फेरीत आलेल्या 650 द्राक्ष उत्पादकांनी प्रत्यक्ष बघितले. त्यात पुणे मांजरी येथील भारत सरकारच्या मध्यवर्ती   द्राक्ष संशोधन केंद्राचे संचालक डाॅ.सावंत व त्यांची शास्रज्ञांची चमू सुद्धा होती. त्यांनी बघितले की द्राक्षवेलींच्या उभ्या खोडावर सभोवताल व जमिनीवरील आच्छादनावर सुंदर बीनाडागांचे निर्यातक्षम द्राक्ष घड आराम करीत होते. काही द्राक्षघड पाणी दिलेल्या ओल्या मातीवर बसलेले पण द्राक्ष मण्यावर कोणताही बुरशीचा डाग नाही. आमचे हे यशस्वी प्रयोग बघून मला शंभर टक्के विश्वास आला की आपण आता हमखासपणे लोखंडाच्या सापळ्याशिवाय फक्त आधार व सावली म्हणून घ्यावयाच्या पांगार्‍यावर किंवा हादग्याचे खोडावर बियांच्या द्राक्ष जाती नक्कीच घेऊं शकतो. मग आम्ही शोध सुरु केला की पन्नास साठ वर्षाआधी लोखंड न वापरता पांगार्‍यावर द्राक्षाच्या जुन्या बियाच्या जाती कोण घेत होते ? ह्या शोध मोहीमेत काही नावे समोर आलीत. ती म्हणजे श्री.राधाकृष्ण पानगव्हाणे 8308659650 व श्री.केशव आप्पा पानगव्हाणे ,श्री.सोमनाथ आबा ताजणे 9423117391, श्री.गुलाब दादा राठी 9423965879 श्री.पुंडलीक महादेव माळी 9423507210 मु.पो.उगांव ता.निफाड जिंनाशिक, श्री.बाळासाहेब जेऊघाले 8600112611 व श्री.सुरेश ढोकळे 9225118322 मुंपो.खेडगांव ता.दिंडोरी जि.नाशीक .श्री.सुखदेव पांडुरंग माळोदे मु.मुंगसरा ता.जि.नाशिक 9689540503 ह्यांना मी भेटून सर्विस्तर चर्चा केली. नंतर नाशीकची आमची टीममधील श्री.नीतीन रेवगडे 7020865656 , व श्री.हीतेश पटेल 9823290969 ह्यांना ह्या जुन्या द्राक्ष उत्पादकांना भेटून चर्चा करायला पाठविले व त्यांचे भेटीचेवेळी मी फोनवर त्या जुन्या शेतकर्‍यांशी सर्विस्तर बोललो. त्यांनी सांगितले की त्यावेळी लोखंडी मंडप किंवा लोखंडी तारांचा व बिनबियांची नंपुसक द्राक्ष जातींचे अजिबात अस्तीत्वच नव्हते. आठ बाय पांच किंवा आठ बाय आठ फुटावर पांगारा लावायचे व त्याचे खोडावर बीयाच्या द्राक्ष वेली चढवायचे. रासायनिक खते त्यावेळी नव्हतीच. फक्त भरपूर शेणखत वापरायचे व बोर्डो ची फवारणी करायचे. वीस पंचवीस वर्ष बागा छान  ऊत्पादन द्यायच्या. परंतु नंतर रासायनिक शेती आली व बीनबियांच्या द्राक्ष जाती आल्यात , तसेच निर्यातीचे वेड लागले व नवीन पिढीने जुन्या पांगारा पद्धतीच्या द्राक्ष बागा बंद केल्यात. मराठवाड्यातील तुळजापूर भवानी जि.ऊस्मानाबादचे नैसर्गिक एसपीएनएब शेती करणारे फळबागायतदार श्री.तुळशीदास फंड 8806550575 ह्यांनी सुद्धा मला अशाच पांगारा वरील द्राक्ष पिकाचच्या मराठवाड्यातील आठवणी माझ्या मागील तुळजापूर भेटीत सांगीतल्यात. शेवटी ह्या संपूर्ण प्रयोगांचा व मिळालेली माहिती ह्याचा संपूर्ण अभ्यास करून शेवटी ह्या माॅडेलचे अंतिम प्रारुप तयार केले जे आपणासमोर ठेवत आहे.
  मागील लेखांकात जरी मी म्हटले की घरातील सदस्यांची संमती घेऊनच हा प्रयोग करावा अन्यथा नाही.ह्या सुचनेमागील माझा भाव होता की कोणताही नवीन प्रयोग करायला घरातील सदस्य सहसा राजी होत नाही, उलट विरोध करतात.जरी मी हे प्रयोग यशस्वी केले तरी मी कोणावर जबरदस्ती करु शकत नाही. घरचा विरोध असेल तर हे माॅडेल उभे करतांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष चुका होतात व मग पूर्ण यश मिळत नाही. परंतु घरचा विरोध नसेल तर मात्र यशस्वीपणे माॅडेल उभे करता येते.हे माॅडेल उभे करण्यात माझा काय आर्थिक लाभ होणार आहे? कारण मला कोणाकडूनही काहीही नको असते, काहीही मानधन घेत नाही. तसेच माझे शिबीरात मी प्रत्येक पिकाचे तंत्र संपूर्ण बारकाव्यासह शेतकर्‍यांना लिहून देतो. उद्देश असतो की शेतकर्‍यांना माझी पुस्तकेसुद्धा विकत घेण्याची वेळ येऊं नये व घरी गेल्यावर सतत वाचून अभ्यास होईल व तंत्र राबवतांना कोणतीही चूक होणार नाही. तसेच हे लिखाण घरातील व गावातील अन्य शेतकर्‍यांना वाचता येईल .तसेच हे माॅडेल उभे करण्यामध्ये शेतकर्‍याचे काहीही नुकसान होणार नाही, कारण विकत आणून काहीही टाकले नाही. उलट पंचस्तरीय बहुफळबागांचे मिश्र जंगल असल्यामुळे प्रत्येक आंतरपिकाच्या उत्पन्नाचा पैसा सतत वर्षभर हातात येणार आहे. ह्या माॅडेलमधील कोणत्याही मुख्य फळपिकांना जंगली जनावरे व पक्षी खात नाहीत. मग जोखीम कोणती आहे ? दाळींब व द्राक्ष आंतरपिकातील फळांना व घडांना पिशवीने झाकले की त्यांनाही त्रास नाही. मी ह्या जापानमधून अडीच रूपये प्रति पिशवी भावाने फळावर लावलेल्या पिशव्या बघितल्या आहेत व त्या पिशव्या घरीच कशा एक रुपयात तयार करता येईल ह्याविषयी तज्ञाशी चर्चा चालूं आहे.
   हे माॅडेल उभे करण्यात कोणतीही जशी जोखीम नाही तसे हातून कोणतेही पाप नाही. कारण लोकांना विषारी फळे खाऊ घालून त्यांना कर्करोग म्हणजे कॅन्सर, मधुमेह व ह्रदयविकाराने म्हणजे हार्ट अटॅकने आपण मारणार नाही,उलट विषमुक्त फळे खाऊ घालून त्यांचे जीव वाचविण्याचे पुण्य पदरात पाडून घेणार आहोत.  रासायनिक व सेंद्रिय शेती करून हरित गृह वायुंचे उत्सर्जन करून आपण जागतिक तापमान वाढ म्हणजे ग्लोबल वार्मींग वाढवून त्याद्वारे जीव जमीन पाणी पर्यावरण व जैवविविधतेचा विनाश आपण करणार नाही, उलट तो विनाश आपल्यापरीने रोखल्याचे पुण्य पदरी पाडणार आहोत. रासायनिक शेती व तीपेक्षाही महाग व खतरनाक सेंद्रिय शेतीतून उत्पादन घटते मात्र उत्पादनखर्च दरवर्षी सतत वाढत जातो त्यामुळे कर्जबाजारी होणे, परतफेड करूच शकत नाही, अशा स्थितीत बंन्केची व सावकाराची जप्ती, परिणामी आयुष्यभर कमावलेली ईज्जत मातीत मिसळणार म्हणून संभाव्य आत्महत्या किंवा गांव सोडून शहरात पलायन करून कुठतरी हमाली करणे व पोट भरत नाही म्हणून गुन्हेगारीकडे वळून  जीवनाचा सत्यानाश करणे. हे माॅडेल उभे केले तर निदान एकरी तीन लाख तर मिळेल ?  शेवटी सतत श्रम व प्रयत्न करून एकरी सहा लाखाचे स्वप्नही साकार करता येईल व गांव सोडून जाण्याची पाळी येणार नाही.उलट गावाकडे परतण्याची संधी मिळेल. स्वप्न पाहीले तरच ते पुर्ण करण्याचा प्रयत्न करता येणार आहे. स्वप्नच पाहीले नाही तर त्याचा पाठलाग कसा करणार ?
    मार्च महिण्यात मीरज जि.सांगलीला मी एक रासायनिक व नैसर्गिक द्राक्ष घेणार्‍या द्राक्षउत्पादकांची बैठक घेतली होती, त्यात एक एकरपासून सत्तर एकर द्राक्ष शेती करणारे सर्वच प्रकारचे द्राक्षबागायतदार हजर होते. विषय होता की  नवीन युवक शेतकर्‍याला जर पहिल्यांदा द्राक्ष बाग उभी करायची असेल तर एक एकरासाठी लोखंडी सांगाडा उभा करण्याला किती खर्च येतो व रासायनिक शेतीत एक एकर द्राक्ष बागेचा वार्षिक उत्पादन खर्च किती आहे ? दिवसभर झालेल्या घमासान चर्चेतून एक नग्न सत्य बाहेर आले की नवीन लोखंडी सांगाडा उभा करायला एकरी तीन लाख ते साडेतीन लाख रुपये खर्च येतो व एका वर्षाचा एकरी उत्पादन खर्च तीन ते साडेतीन लाख आहे. म्हणजे एकरी सात लाख रुपय भांडवली गुंतवणूक ! एक दीड एकर जमीन धारणा असलेला तरूण शेतकरी कोठून आणणार आहे सात लाख? बॅन्क व सावकाराचे कधीच न फेडता येणारे व शेवटी आत्महत्येला प्रवृत्त करणारे कर्ज मिळणे आता शक्य नाही. मग ह्या लहान एक दीड एकर जमीन धारणा असलेल्या तरूण शेतकर्‍यांनी एकरी सहा लाख रुपये उत्पन्न घेवून घरबसल्या महिण्याचा पन्नास हजार रुपये पगार गावीच आपल्याच काळ्या आईचे अंगाखांद्यावर कमावण्याचे स्वप्न पाहूच नये काय ? त्यांनी शहरात जाऊन हमालीच करावी काय किंवा काहीच करता आले नाही तर गुन्हेगार बनायचे काय ?  नाही नां ? मग त्यासाठी आपले हे संपूर्ण स्वदेशी 100 % सुभाष पाळेकर नैसर्गिक कृषी तंत्राने उभे करायचे लोखंडमुक्त कर्जमुक्त शून्य खर्चाचे एकरी सहा लाखाचे स्वप्न साकार करायला आता लगेच सुरुवात करायचे हे माॅडेल आहे. ते उभे करण्यासाठी किंवा आता उभ्या असलेल्या फळबागेचे ह्या माॅडेलमध्ये रुपांतरण करण्यासाठी काय काय केले पाहीजे ते संपूर्ण तंत्र आपण उद्याच्या लेखांक नं. 3 मध्ये समजून घेणार आहोत.
    धन्यवाद !