पंचस्तरीय फळबाग जंगल पाळेकर माॅडेल: लेखांक # 6

कृषी-ऋषी पद्मश्री सुभाष पाळेकर, अमरावती, महाराष्ट्र.
पंचस्तरीय फळबाग जंगल पाळेकर माॅडेल: लेखांक क्र. 6

मित्रांनो, उन्हाळ्यात खड्डे करून व ते खड्डे शेजारी ढीग लावलेल्या नर्सरी मातीने भरुन त्या खड्यावरील मध्यभागी फळझाड रोप लावायची खुण म्हणून पावसाला सुरुवात होताच दोन बिया बाजरी अधिक दोन बिया ज्वारी अधिक दोन बिया नाचणी म्हणजे रागी दोन बिया वरी म्हणजे भगर अधिक दोन बिया मूंग अधिक  चवळी मिसळून व बीजामृताचा संस्कार करून हे बीजमिश्रण टोका डोबा. पुढे आगष्टचे दुसर्‍या पंधरवाड्यात ते बाजरा चवळी व मूंगासकट उपटुन त्या ठिकाणी फळझाडाचे रोप लावायचे आहे. बाजरा ,मुंग व चवळीचे तुकडे करुन त्याचे रोपाभोवती आच्छादन करायचे आहे.म्हणजे बाहेरुन आच्छादनासाठी काष्टअवशेष आणण्याची आवश्यकता पडत नाही.
   ह्या माॅडेल फळझाडांच्या दर सहा फुटावर येणार्‍या दोळ ओळींचे मधल्या पट्ट्यात  शेवगा, हादगा, ह्यांचे बी व त्या सोबतच ज्या चौफुलीवर तूर घ्यायची आहे  त्या आखून दिलेल्या  चौफुल्यांवर पुढील  तूरअंबाडीसूर्यफूलतीळचवळीबाजराज्वारीनाचणीभगर ह्यांचे मिश्रण केलेले एकत्रित बीजमिश्रण ज्या ज्या एका आड एक चौफुल्यांवर लावायचे आहे व एका आड एक कापूस लावायचा आहे  त्या त्या चौफुल्यांवर पावसाळा सुरु होताच बीजामृताचा संस्कार करून ते बी मिश्रण एका आड एका चौफुलावर टोका म्हणजेच डोबा व त्यानंतरच्या एकाआड एक रिकाम्या चौफुल्यांवर देशी कापूस बी बीजामृताचा संस्कार करून लावा. म्हणजे ह्या चौफुल्यांवर एक तूर पुढे एक कापूस पुन्हा तूर व कापूस असा क्रम येईल..ह्या आंतरपिकांपासून आपल्याला घरी जेवनात बाजरीची किंवा ज्वारीची नाचणीची भगरीची भाकर ईडली दोसा, तुरीचे वरण,अंबाडीची हिरवी किंवा सुकवलेली पाने व चवळी शेंगांची  भाजी,अंबाडी,सूर्यफूल व तीळाचे तेल मिळेल.तसेच आपल्याला खादी कापडासाठी व शिल्लकचा कापूस विकून दिवाळीला पेसे मिळण्यासाठी घरचाच कापूस मिळेल. वर्धेला मगन संग्राहलयात कापूस देऊन कापड मिळण्याची व्यवस्था आहे. देशी कापूस बियासाठी संपर्क करा..श्री.सचिन झाडे,कमलनयन बजाज फौंडेशन वर्धा 8805009737, श्री.गजानन गारघाटे  मगन संग्रहालय समिती,वर्धा 9881576605,  9834497887. ह्या दोन्ही संस्था सुभाष पाळेकर नैसर्गिक शेती जन चळवळीतील प्रमुख संस्था आहेत व त्या दोन्ही संस्थात दोन हजार शेतकरी सुभाष पाळेकर कृषी करतात.त्यांचेकडे देशी ज्वारी तूर अंबाडी तीळ जवस व गावरानी भाजीपाला ह्यांचे बी सूद्धा शिल्लक असेल तर उपलब्ध होईल.
    त्याचवेळी फळझाड रोपांच्या ओळीत व त्याखालील तुरीच्या ओळीत प्रत्येक दोन चौफुल्यांचे मध्ये असणार्‍या रिकाम्या जागेचा कौटुंबिक सदुपयोग करण्यासाठी त्या रिकाम्या जागेत खरीप कांदा मेथी धणे पालक अद्रक हळद ह्यांचे बी किंवा बेणे लावा. ह्यापासून वरण व भाजीचे फोडणीचे साहित्य मिळून जाईल. पुढे हे खरीप आंतरपीक निघाल्यावर रबीत त्याच जागी हरभरा, देशी लसून,जीरे,धणे,मेथी,पालक,गाजर,मुळा,वाल,बीट, मोहरी,रबी कांदा, जवस करडी सूर्यफुल ईत्यादि आंतरपिकांचे बी बीजामृताचा संस्कार करून टोका डोबा किंवा रोप लावा. ह्यापासून जेवनासाठी लागणारे तेल ,कोशिंबीर व फोडणीचे साहित्य मिळून जाते. आता आंतरपिकांचे हे जंगल पाहून माझे शिबीर ऐकले नसेल तर तुमचे मनांत शंका येईल की ही सर्व संमिश्रित रोपे व झाडे एकमेकाशी अन्नद्रव्ये घेण्याची आपसात स्पर्धा करतील. आपण ही भीती मनातून ताबडतोप काढून टाका. कृषी विद्यापीठे खोटे बोलतात की दोन झाडात स्पर्धा असते. सत्य हे आहे की कोणत्याही दोन झाडात अन्न द्रव्यांची स्पर्धा बिलकूल नसते. झाडांचे 98.5 % शरीर फक्त हवा पाणी व सूर्यप्रकाशापासून बनते ,जे आपण देत नाही. मग स्पर्धेचा प्रश्न कुठे येतो ? फक्त स्पर्धा ओलावा व सूर्यप्रकाश घेण्यात असते. ती टाळण्यासाठी वेळोवेळी निंदण खुरपण केलेच पाहीजे. हे माॅडेल कष्टकरी लहान शेतकर्‍यांसाठी आहे, स्वता कष्ट न करता फक्त मजूर लावून शेतीकाम करून घेणार्‍या शहरी शेतीशौकीन लोकांसाठी नाही. त्यांनी ह्या भानगडीत कृपया पडूं नये. एक रुपयात गहू व दोन रुपयात तांदूळ मिळणार्‍या ह्या जमान्यात मजूर मिळेलच ह्याची बिलकूल हमी नाही.
     सीताफळाचे बी फळातून बाहेर काढल्यावर तीन महिण्यापावेतो सुप्तावस्थेत असते व नंतर सुप्तावस्था तोडून तीन वर्षापर्यंत त्याची उगवणक्षमता राहते.एका पूर्ण पक्व सीताफळ फळात 36 ते 48 बिया मिळतात. सीताफळाच्या बिया पावसाळा सूरु होताच आवश्यक ओलावा उपलब्ध होताच बीजामृताचा संस्कार करून ज्या चौफुलीवर सीताफळ झाड उभे करायचे आहे त्या चौफुलीवर टोका म्हणजेच डोबा. नंतर त्यावर चांगल्या माळ्याचे हातून बालानगर किंवा अॅनोना हनुमानफळाची कलम करून घ्या. जर कलम केलेले आयते रोप लावायचे असेल तर आगष्टचे दुसर्‍या पंधरवाड्यात आश्लेषा नक्षत्रात खड्यात रोप लावणी मागील लेखांकात सांगितल्यानुसार करा. कलम केलेले जीवामृतावरील हनुमानफळाचे रोप पाहीजे असेल तर श्री.सुरेश पाटील ,सरस्वती नर्सरी,मु.पो.हळदगांव ता.समुद्रपूर जि.वर्धा 9960519004 ह्यांना संपर्क करा. सीताफळाचा गर वेगळे करण्याचे यंत्र आहे व त्या गरावर प्रक्रिया करून साठवून विकण्याचे तंत्रज्ञान सुद्धा सीताफळ उत्पादक संघाकडे उपलब्ध आहे. सीताफळ दाळींब  ह्यांवर बारमाही पाणी उपलब्ध असेल तर वर्षभर सदाबहार फळे घेता येतात. परंतु पाण्याची टंचाई असेल तर मात्र फक्त पावसाळ्यावर जगवणारा मृग बहारच घ्यावा. पावसावर झाडे जगतात. पुढे दोन तीन पाण्यात हमखास फळे घेता येतात. फळकाढणी झाल्यावर पुढे झाडांची पाने गळून पडतील व झाडे सुकल्यासारखी दिसतील. रासायनिक शेतीत ती पूर्ण सुकतील. परंतु सुभाष पाळेकर नैसर्गिक कृषी तंत्रात पानगळ होऊन सुकल्यासारखी दिसतील पण सुकलेली नसतील, आंतून धुगधुगी कायम असेल.झाडे चक्क समाधीत गेलेली असतील. पुढील पावसाळा सुरुवात होताच समाधी भंग करून झाडांना पुन्हा नवीन पालवी फुटून येते व बहार येतो. फक्त पावसाळ्यात जमिनीला भरपूर जीवामृत पाजा. अशा पद्धतीने मृग बहाराची दाळींब फळबाग सातारा जिल्यातील सदा दुष्काळी माण  तालुक्यातील बीदाल गावचे सुभाष पाळेकर शेती पद्धतीने दाळींब घेणारे दाळींब उत्पादक श्री.दीपक बोराटे 9423863440 हे घेतात.त्यांचेशी चर्चा करावी......पुढील लेखांकाची वाट बघा. मी ह्यावेळी हिमाचल प्रदेशात असून पालनपूर कृषी विद्यापीठात सरकारने आयोजित केलेले माझे राज्यस्तरीय सहा दिवसांचे शिबीर प्रचंड गर्दीत सुरु आहे. त्यामुळे वेळ कमी मिळतो आहे. धन्यवाद